कर्जमाफी म्हणजे फॅशन!  - वेंकय्या नायडू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची तयारी सुरू केली असतानाच, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी कर्जमाफी म्हणजे फॅशन झाल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुंबईत आज पुणे महापालिकेच्या रोखे सूचिबद्ध सोहळ्याला उपस्थित असलेल्या नायडू यांनी कर्जमाफीबाबत हे वादग्रस्त विधान केले. मात्र, आपले हे विधान राजकीय पक्षांना उद्देशून असल्याचा दावा त्यांनी नवी दिल्लीत "पीटीआय' या वृत्तसंस्थेबरोबर बोलताना केला. 

कर्जमाफी दिल्याने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतात, असा समज तयार झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा अंतिम उपाय नाही. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कर्जमाफी देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. नायडू म्हणाले, की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे; मात्र त्यांच्या कर्जमाफीचा विषय आता फॅशनसारखा झाला आहे. यासाठी निकष आणि इतर गोष्टींकडे कोणी लक्ष देत नसल्याचेही ते म्हणाले. कर्जासाठीचा पैसा हा सर्वसामान्यांचा पैसा आहे, तो परत करण्यासाठी जनजागृती करणे आवश्‍यक असल्याचे मत नायडू यांनी व्यक्त केले. सत्तेत असताना पाच वर्षे काही करत नाही आणि निवडणुका जवळ आल्या, की मतदारांना आमिषे दाखवली जातात. मोफत वस्तू देण्याइतकी देशाची स्थिती आहे का, असा प्रश्‍न त्यांनी केला. देशात अनेक समस्या आहेत. स्वातंत्र्यानंतर 69 वर्षे उलटून गेली तरी 60 टक्के नागरिकांना शौचालये नाहीत. पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यावर स्थानिक प्रशासनाने भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नायडू यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावर इतर राजकीय पक्षांनी टीका केली आहे. 

"विधान राजकीय पक्षांबाबत' 
कर्जमाफीसाठी राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या अहमहमिकेबाबत हे विधान केले होते, असे नायडू यांनी नवी दिल्लीत "पीटीआय' या वृत्तसंस्थेबरोबर बोलताना नमूद केले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कर्जमाफी हा उपाय नाही; अगदी तातडीच्या स्थितीत तो तात्पुरता उपाय आहे, असे ते म्हणाले. शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुधारणे, ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे उभारणे, खात्रीशीर वीजपुरवठा उपलब्ध करणे, शीतगृहे आणि गोदामांची उभारणी आणि शेतकऱ्यांना वेळेत आणि कमी दराने कर्ज देण्यासारख्या उपायांवर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली. 

शेतकरी आत्महत्याही फॅशनेबल आहेत, असे आता हे सरकार म्हणेल काय? शेतकऱ्यांना खरी गरज कर्जमाफीपेक्षा अधिक ठोस उपाययोजना करण्याची असून, त्यांची थट्टा करण्याची नव्हे. 
- सीताराम येचुरी, सरटिणीस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष 

श्रीमंताची कर्जे माफ करताना त्यात फॅशन आढळत नाही. परंतु, शेतकऱ्यांची कर्जे माफ करताना त्यात फॅशन दिसते. एका व्यक्तीचे कर्ज माफ करता; मात्र कोट्यवधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करीत नाही. 
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली