विंदांच्या जन्मशताब्दीची अखेर सरकारला आठवण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात झाली; मात्र त्याबाबत अनेक खासगी कार्यक्रम हाती घेतले जात असताना सरकारच्या पातळीवर काहीच होत नसल्याने त्या अनास्थेवर बोट ठेवणारी बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सरकारला जाग आली असून, अखेर भिलारमधील पुस्तकांच्या गावात ‘स्मरण विंदांचे’ कार्यक्रम होणार आहे.

साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने ज्यांचा गौरव करण्यात आला त्या विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारी पातळीवर कोणत्याच कार्यक्रमाचे आयोजन न केल्यामुळे साहित्यिक वर्तुळातून टीका करण्यात आली होती. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र पाठवून सरकारी अनास्थेसंदर्भात विचारणाही केली होती. त्यानंतर यंत्रणेला जाग आली असून, येत्या १६ सप्टेंबरला भिलारमध्ये ‘स्मरण विंदांचे’ कार्यक्रम राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. पुस्तकांच्या या गावात साहित्यिक जाणिवा समृद्ध होणारे कार्यक्रम यापुढे सादर केले जाणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप परिसंवाद, कविसंमेलन आणि अभिवाचन असे असेल. 

अरुणा ढेरे, अभिराम भडकमकर, प्रदीप निफाडकर, ऐश्‍वर्य पाटेकर, डॉ. अविनाश सप्रे, श्रीधर नांदेडकर, सौरभ गोखले, संगीता बर्वे, प्रमिती नरके आदी मान्यवर साहित्यिक त्यात सहभागी होणार आहेत.

वर्षभर कार्यक्रम साजरे होणे गरजेचे
विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यिक-कलाकारांची समिती नेमून वर्षभराचा कार्यक्रम आराखडा जाहीर करावा, असे पत्र महामंडळाच्या वतीने देण्यात आले होते; मात्र सद्यःस्थितीत पुस्तकांच्या गावी कार्यक्रम केला जात आहे हेही नसे थोडके. एवढ्या महान साहित्यिकाची आठवण म्हणून वर्षभर कार्यक्रम होणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी दिली.