भावे नाट्यगृहाला मिळणार झळाळी नूतनीकरणासाठी १३ कोटींचा खर्च

भावे नाट्यगृहाला मिळणार झळाळी नूतनीकरणासाठी १३ कोटींचा खर्च

नवी मुंबई - नवी मुंबईची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या व वृद्धिंगत करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला नवी झळाळी मिळणार आहे. त्यासाठी १२ कोटी ७९ लाख खर्च येणार आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा प्रशासकीय प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. त्याला मंजुरी मिळाल्यावर हे काम सुरू होणार आहे. १९९६ मध्ये सिडकोने बांधलेले विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्‍यक कामे करण्यात आली. तथापि, त्याचे नूतनीकरण केले नव्हते. कलावंत व रसिकांना उच्च दर्जाचे व अत्याधुनिक सोई-सुविधांनी युक्त नाट्यगृह मिळण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा कलात्मक आराखडा वास्तुविशारद सोपान प्रभू यांनी तयार केला आहे. त्यात स्थापत्य व विद्युत कामे तसेच अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. अंतर्गत भागातील स्थापत्य कामे, प्रेक्षागृहातील नवीन खुर्च्या, कलावंतांसाठी विश्रांती कक्ष व खोल्या, कार्यालयाचे व लॉबीचे नूतनीकरण, अग्निशमन यंत्रणा, पार्किंगचे नियोजन, संरक्षक भिंतीची दुरुस्ती, दिव्यांगांच्या प्रवेशासाठी बॅरिअर फ्री प्रवेश, आंतरराष्ट्रीय दर्जाची ध्वनिक्षेपक यंत्रणा, अद्ययावत प्रकाश योजना, वातानुकूलित व्यवस्थेचे आधुनिकीकरण, ध्वनी व प्रकाश योजना, कॉस्टिकविषयक कामे, वीज, ध्वनी व प्रकाश योजनाविषयक कामे आदींचा यात समावेश आहे. या कामांसाठी १२ कोटी ७९ लाख खर्च येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com