घटस्फोटाच्या दाव्यातील नोटीस न घेतल्यास वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - घटस्फोटाच्या दाव्यात न्यायालयाने पाठवलेली नोटीस न घेणाऱ्या महिलेविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई - घटस्फोटाच्या दाव्यात न्यायालयाने पाठवलेली नोटीस न घेणाऱ्या महिलेविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयात दाखल झालेल्या एका घटस्फोट प्रकरणात चेंबूरमध्ये राहणाऱ्या पतीने स्थानिक कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पत्नीला प्रतिवादी करण्यात आले आहे. सुनावणीला हजर राहण्यासाठी पत्नीला नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, तिच्या वतीने कोणीही न्यायालयात हजर झाले नाही. याबाबत मागील सुनावणीला न्यायालयाने पत्नीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तरीही नुकत्याच झालेल्या सुनावणीलाही ती गैरहजर होती. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. यापुढच्या सुनावणीला ती हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट बजावले जाईल, असा इशारा न्यायाधीश आर. एम. सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठाने दिला आहे.

संबंधित महिलेचे वर्तन अयोग्य असल्याचे मतही खंडपीठाने व्यक्त केले. माहुल येथील पोलिस ठाण्याला न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत. संबंधित महिलेला नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिस ठाण्याला दिले आहेत.