वाशी मार्केट वादाच्या भोवऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

नवी मुंबई - वाशी सेक्‍टर १९ ‘ए’मधील नाल्याशेजारी आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून बांधण्यात येणारे मार्केट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शुक्रवारी (ता. २१) सकाळी आमदार म्हात्रे यांच्या हस्ते मार्केटच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले; मात्र या मार्केटला आरोग्य, विधी आणि नगररचना विभागाकडून मागवलेला अभिप्राय नकारात्मक आला आहे. त्यामुळे उपमहापौर अविनाश लाड यांनी त्याला विरोध करून मार्केटचे काम थांबवले नाही, तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील पदपथांवर फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत असताना आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून वाशीत भाजीपाला मार्केट बांधण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटीची इमारत सेक्‍टर १९ ए मधील नाल्याच्या शेजारी बांधण्यात येणार आहे; मात्र या मार्केटला उपमहापौर अविनाश लाड यांनी विरोध केल्यामुळे मार्केटचे काम सुरू होण्याआधीच अडचणीत सापडले आहे. मार्केटची ही इमारत नाल्याच्या शेजारी बांधली जात असल्यामुळे त्याचा नाल्यावर परिणाम होईल, असा अभिप्राय नगररचना विभागाने दिला आहे. नाल्याच्या १५ मीटर डावीकडे आणि उजवीकडे बांधकाम नसावे, असे मत नगररचना विभागाने नोंदवले आहे. हे मार्केट शहराच्या मध्यभागी व रहदारीच्या ठिकाणी होणार असल्याने मार्केटमधील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचेल, असे मत आरोग्य विभागाच्या अभिप्रायात आहे. विधी विभागाला या मार्केटच्या बांधकामाची माहितीच नसल्याचा अभिप्राय मिळाला असल्याचे लाड यांनी म्हटले आहे. 

महापालिकेच्या या सर्व विभागांकडून विरोध होत असताना वाशीमध्ये या मार्केटची आवश्‍यकता नाही. तरीही येथे मार्केटची इमारत बांधण्याचा घाट का घातला जातोय, असा सवाल उपमहापौर लाड यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या मार्केटला त्यांनी विरोध केला आहे. मार्केटचे बांधकाम न थांबवल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवारी सकाळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते मार्केटच्या कामाचे भूमिपूजन झाले. येथे २०० फेरीवाल्यांसाठी गाळे बांधण्यात येणार आहेत. या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह फेरीवाले व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.  

पदपथांवर धक्के खात पोटाची खळगी भरणाऱ्या फेरीवाले आणि नागरिकांच्या सोईच्या ठिकाणी मार्केट बांधले जात आहे. त्याची गरज व कागदपत्रांची पडताळणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. आर्थिक हेतू पूर्ण करण्यासाठी काही जणांकडून याला विरोध केला जात आहे. 
- मंदा म्हात्रे, आमदार

वाशीतील नाल्याशेजारी बांधण्यात येणाऱ्या मार्केटच्या इमारतीमुळे नाल्यावर परिणाम होणार आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार आहे, असे पालिकेचे मत आहे. त्यानंतरही नागरिकांच्या पैशांचा चुराडा करून हे बांधकाम होणार असेल, तर ते करू देणार नाही.  
- अविनाश लाड, उपमहापौर