दुर्मिळ ग्रंथ नामशेष होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

ग्रंथपालांच्या डोळ्यांत अश्रू, डिजिटायझेशनचा खर्च कोण करणार?

ग्रंथपालांच्या डोळ्यांत अश्रू, डिजिटायझेशनचा खर्च कोण करणार?
मुंबई - दुर्मिळ ग्रंथांचा शोध घेत ग्रंथालयांकडे येणाऱ्या अभ्यासू वाचकांची संख्या वाढत असताना हे ग्रंथ मात्र अस्तित्वासाठी झगडत आहेत. त्यांचे जतन कसे करावे? डिजिटायझेशनसाठी येणारा खर्च कसा पेलावा, असे प्रश्‍न ग्रंथालयांना पडले आहेत; तर दुर्मिळ ग्रंथ नामशेष होण्याच्या वाटेवर असल्याने ग्रंथपालांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.

माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, पुस्तकांच्या किडल एडिशनला मिळणारा प्रतिसाद यामुळे ग्रंथालयांतून पुस्तके नेऊन वाचणाऱ्यांची संख्या झपाट्याने घसरत आहे. परिणामी, राज्यातील अनेक ग्रंथालये अस्तित्व टिकविण्यासाठी झगडत आहेत. दुर्मिळ पुस्तके असलेली जुनी ग्रंथालये तर जिज्ञासू आणि अभ्यासू वाचकांच्या प्रेमामुळे अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसाधारण वाचकांची संख्या घटत असली, तरी दुर्मिळ ग्रंथांसाठी अभ्यासू वाचकांचे पाय याच ग्रंथालयांची वाट धरतात. परंतु या ग्रंथालयांपुढे आव्हान आहे ते दुर्मिळ ग्रंथसंपदा टिकवण्याचे.

राज्यभरातील अनेक जुन्या ग्रंथालयांमध्ये असे शेकडो दुर्मिळ ग्रंथ आहेत, ते ठेवण्यासाठी ग्रंथालयांकडे पुरेशी आणि सुरक्षित जागाही नसल्याने त्यांचे जतन करणे कठीण जात आहे. या ग्रंथांना वाळवी लागणे, जीर्ण झाल्याने त्यांची पाने फाटणे यामुळे ते नष्ट होण्याची भीती आहे. ग्रंथालयांच्या अनुदानाचा प्रश्न सुटत नसताना ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्‍न आहे.

हा ठेवा सरकारने जपावा
एखाद्या ग्रंथालयात साधारण पन्नास ते शंभर दुर्मिळ ग्रंथ असतात. त्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. तो कोण देणार? सरकारने ग्रंथालयांमधील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन एकाच वेळी करून हा दुर्मिळ ठेवा वाचवावा, अशी विनवणी ग्रंथपाल करीत आहेत.

अनेक वाचक दुर्मिळ ग्रंथासाठी वाचनालयात येतात. मात्र त्या ग्रंथाची अवस्था पाहिल्यावर ते वाचकांना देता येत नाहीत. त्यांचे लवकरात लवकर डिजिटायझेशन करणे आवश्‍यक आहे. अन्यथा हा दुर्मिळ ठेवा नष्ट होईल.
- अश्विनी फाटक, ग्रंथपाल, दादर सार्वजनिक वाचनालय.

अनेक ग्रंथालयांकडे दुर्मिळ पुस्तके आहेत. त्यांच्या डिजिटायझेशनचा खर्च त्यांना परवडणारा नाही. सरकारने अनेक ग्रंथालयांकडील दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन एका छताखाली करावे.
- मंजिरी वैद्य, ग्रंथपाल, लोकमान्य सेवा संघ वाचनालय, विलेपार्ले