मुंबईकडे येणारा शस्त्रसाठा जप्त

मुंबईकडे येणारा शस्त्रसाठा जप्त

नाशिक/ मुंबई - सतत दहशतवादाच्या छायेत असलेले मुंबई शहर शुक्रवारी पुन्हा घातपातातून बचावले. उत्तर प्रदेशमधून मालेगावमार्गे मुंबईकडे येणाऱ्या बोलेरो गाडीतून  दहशतवादविरोधी पथक व नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री मोठा शस्त्रसाठा जप्त केला. हा शस्त्रसाठी मुंबईतील ॲन्टॉप हिल येथे आणण्यात येत होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

मालेगावमधील एका पेट्रोलपंपावर बोलेरो गाडी इंधन भरण्यासाठी थांबली असत त्या गाडीचा चालक आणि पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये पैशावरून वाद झाला. त्यावेळी चालकाने तेथील कर्मचाऱ्यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पैसे न देताच तेथून काढता पाय घेतला. पंपावरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चांदवर टोलनाक्यावर गाडी अडवून तिघांना अटक केली. बद्रीनुजमान अकबर बादशहा, सलमान अमानुल्ला खान व नागेश राजेंद्र बनसोडे अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी बादशहा आणि सलमान मुंबईतील शिवडी येथील तर बनसोडे नाशिकचा रहिवासी आहे.

त्यांच्या गाडीतून पोलिसांनी २५ लहान-मोठ्या रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि सुमारे साडेचार हजार जिवंत काडतुसे वाहनातून जप्त केली आहेत. याशिवाय काही बाटल्या आणि संशयास्पद काही वस्तूही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. 

अटक करण्यात आलेल्या तिघांनी उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील दोन शस्त्रांच्या दुकानात दरोडा टाकला होता. त्यावेळी त्यांना हा शस्त्रसाठा मिळाला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ॲन्टॉप हिल येथील बेकायदा शस्त्र विकणाऱ्या एकाशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने शस्त्र मुंबईत घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार ते तिघे गाडीच्या सीटमध्ये व दरवाजाच्या आत शस्त्र लपवून मुंबईत आणत होते. आरोपींपैकी बादशहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी सुमारे ६० गुन्हे दाखल असल्याचे समजते. त्याचे मुंबईतील गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असून, गुन्हेगारांना हत्यारे पुरविण्याचे काम तो करतो, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक आणि मुंबईतील दहशतवादविरोधी पथकेही चांदवडमध्ये दाखल झाली आहेत. नाशिक पोलिसांचे एक पथकही मुंबईत आले आहे. या प्रकारामागे अंडरवर्ल्डचा हात असल्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com