'प्रयत्न करा; यश नक्की मिळेल'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

यश कोणत्याही क्षेत्रात आहे; परंतु त्यासाठी मेहनत गरजेची आहे. लग्नानंतर करिअर करता येत नाही, अशी महिलांची ओरड असते. माझे लग्न १७ व्या वर्षी झाले. लग्नानंतर पती, सासू-सासरे आणि आई-वडिलांचे सहकार्य मिळाल्याने शिक्षण घेऊन पदवी मिळवली. 
- जुनेरिया नुसरत, फॅशन डिझायनर  

खारघर - ‘काय व्हायचे हे अगोदर निश्‍चित करा. त्या दिशेने पाऊल टाका... तुम्हाला यश नक्की मिळेल,’ असा मौलिक सल्ला आयपीएस अधिकारी आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांनी विद्यार्थिनींना दिला. ‘सकाळ’ यिनच्या वतीने खारघरमधील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गुरुवारी (ता. ११) झालेल्या ‘महिला सक्षमीकरण’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 

भावी वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या कार्यशाळेला विद्यार्थिनींनी चांगलीच गर्दी केली होती. पदवी आणि पदवीव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांसाठी महिला सक्षमीकरण, खेळ, शिक्षण, राजकारण आदी विषयांवर कार्यक्रमात माहिती देण्यात आली. कृष्ण प्रकाश यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गृहिणी म्हणून जीवन न जगता तुम्हाला काय व्हायचे आहे, हे अगोदर निश्‍चित करा. त्या दिशेने पाऊल टाका. तुम्हाला नक्की यश मिळेल. 

व्यासपीठावर सरस्वती महाविद्यालयाच्या प्राचार्य मंजुषा देशमुख, फॅशन डिझायनर जुनेरिया नुसरत, सामाजिक कार्यकर्त्या झिनल पटेल, ‘सकाळ’ (मुंबई)चे युनिट व्यवस्थापक पीटर दास, यीन रायगड समन्वयक गणेश घोलप आदी उपस्थित होते. 

नुकताच नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. दुर्गेची अनेक रूपे आहेत. दुर्गा म्हणजे ताकदीचे प्रतीक आहे. तीच दुर्गा तुमच्यात आहे. तुम्ही स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहात. तुम्ही गृहिणी म्हणून न राहता माणूस म्हणून देशासाठी योगदान द्या. विश्वामित्राने स्त्री-पुरुषांची निर्मिती केली आहे. परंतु धर्म एकच आहे. तो म्हणजे मानवधर्म, अशा शब्दांत कृष्ण प्रकाश यांनी मार्गदर्शन केले. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे महिलांसाठी कायदा करण्यात आला; परंतु त्याविषयी महिला माहिती घेत नाहीत. ती घेणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

महिलासुद्धा आयर्न लेडी बनू शकतात; परंतु त्यासाठी जिद्द आणि मेहनत आवश्‍यक आहे. आयर्न मॅन म्हणून मिळालेल्या यशात मुलीची साथ, पत्नीचे सहकार्य आणि आईचा आशीर्वाद आहे, असे कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले.  फॅशन डिझायनिंगमध्ये खूप काही करता येण्यासारखे आहे; परंतु मेहनत घ्यायची तयारी हवी, असे फॅशन डिझाईनर जुनेरिया नुसरत यांनी सांगून विद्यार्थ्यांना चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी काही टिप्स दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती कॉलेजमधील यिनचे प्रोग्राम हेड चेतन ठाकूर यांनी मेहनत घेतली. 

मुलींनी शिक्षण घेऊन घरी न बसता विविध क्षेत्रात काम करावे आणि आपल्या हक्कासाठी लढावे. त्यातून महिलांचे सक्षमीकरण होईल.
- प्रा. मंजुषा देशमुख,  सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय, खारघर

Web Title: mumbai news YIN