ठाणे स्थानक तुडुंब; मध्य रेल्वेच्या प्रवाशांची 'सत्त्वपरीक्षा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

ठाणे : दुरांतो एक्‍स्प्रेसचा अपघात आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी गावाकडे निघालेल्या प्रवाशांची मंगळवारी सत्त्वपरीक्षाच घेतली. कल्याण स्थानकात येणाऱ्या गाड्या मंगळवारी ठाणे स्थानकातूनच पनवेलमार्गे वळवल्यामुळे कल्याण स्थानकातून प्रवासाच्या तयारीत निघालेल्या प्रवाशांना अवजड सामानासह लोकलने ठाणे गाठावे लागले.

ठाणे : दुरांतो एक्‍स्प्रेसचा अपघात आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी गावाकडे निघालेल्या प्रवाशांची मंगळवारी सत्त्वपरीक्षाच घेतली. कल्याण स्थानकात येणाऱ्या गाड्या मंगळवारी ठाणे स्थानकातूनच पनवेलमार्गे वळवल्यामुळे कल्याण स्थानकातून प्रवासाच्या तयारीत निघालेल्या प्रवाशांना अवजड सामानासह लोकलने ठाणे गाठावे लागले.

ठाणे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच या लोकल खोळंबल्याने हजारो प्रवासी रेल्वे रुळावर उतरून चालत ठाण्याकडे निघाले होते. रेल्वे रुळावरील ठाणे खाडीवरील अरुंद पुलावरील जीवघेणा प्रवासही या प्रवाशांनी पूर्ण केला; परंतु तरीही गाडी चुकल्यामुळे प्रवाशांना गाड्यांच्या प्रतीक्षेत ठाणे स्थानकामध्ये ताटकळत बसावे लागत होते. 

गणेशोत्सवाची सुटी आणि पुढील महिन्यातील बकरी ईद यामुळे मोठ्या संख्येने गावाकडे निघालेल्या प्रवाशांना मंगळवारी मध्य रेल्वेच्या विस्कळित झालेल्या सेवेचा फटका बसला. दुरांतो एक्‍स्प्रेसच्या अपघातानंतर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या पनवेलमार्गे लोणावळा आणि तेथून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आल्यामुळे कल्याणच्या प्रवाशांना लोकल गाड्यांनी ठाण्याकडे पोहोचण्याशिवाय पर्याय नव्हता. नागरिकांनी कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील गाड्यांमधून मोठ्या सामानासह नागरिक मध्य रेल्वेच्या गाड्या पकडण्यासाठी ठाणे स्थानकाकडे रवाना होत होते; परंतु या गाड्या कळवा स्थानकातून पुढे आल्यानंतर अचानक खोळंबल्यामुळे या प्रवाशांना मेल-एक्‍स्प्रेस मिळवण्यासाठी सामानासह रेल्वे रुळावर उतरून फलाटांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. कल्याणकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची मोठी रांग कळवा स्थानकाच्या आसपास लागली होती. 

कळवा-ठाणे लोकल गाड्यांना दीड तास 
कळव्याहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलगाड्या ठाणे स्थानकात दाखल होण्यासाठी मंगळवारी सुमारे एक ते दीड तास लागत होता. कळव्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणाऱ्या लोकलच्या कळव्यापुढे रांगा लागल्यामुळे जागच्या जागी खोळंबून पडल्या होत्या. गाड्यांमधून उतरून स्थानक गाठणारी मंडळी अवघ्या दहा मिनिटांत स्थानकात पोहोचत होती. काही मंडळींनी कळवा स्थानकातून चालत ठाण्याच्या दिशेचा प्रवास केला. 

ठाणे खाडीपुलावरून जीवघेणा प्रवास 
कळवा आणि ठाणे स्थानकादरम्यान खाडीपूल असून केवळ लोखंडी पोलवर रेल्वे रूळ टाकून हा पूल तयार करण्यात आला आहे. या पुलावरून चालताना प्रवाशांना पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा त्रास जाणवला. अरुंद पत्र्यावरून प्रवाशांनी हा पूल ओलांडला. त्याच वेळी कल्याणकडे जाणारी लोकल वाहतूक सुरू असल्यामुळे जीवाचा धोका पत्करून प्रवाशांना या पुलावरून ठाण्याकडे जावे लागत होते. 

महिन्याच्या मुलासह महिलेची प्रतीक्षा 
ठाणे स्थानकाने कल्याणवरून येणाऱ्या गाड्यांमधून प्रवाशांची गर्दी झाल्यामुळे गर्दीचा उच्चांक गाठला होता. येथे एक महिला अवघ्या महिन्याच्या मुलासह गाडीची प्रतीक्षा करत असल्याचे दिसले. पाऊस आणि अपघाताच्या घटनेमुळे फोनची रेंजही नव्हती आणि बॅटरीही उतरल्यामुळे घरच्यांशी संपर्क करणेही कठीण जात होते. सहप्रवाशांची मदत घेण्यासही महिला घाबरून गेल्यामुळे प्रतिसाद देत नव्हत्या. काही ज्येष्ठ नागरिकांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे प्राथमिक उपचार केंद्रामध्ये गर्दी उसळली होती. 

वळवलेल्या, रद्द केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या 
तपोवन एक्‍स्प्रेस, लखनऊ पुष्पक एक्‍स्प्रेस, गोरखपूर एक्‍स्प्रेस, फिरोजपूर पंजाब मेल, राज्यराणी एक्‍स्प्रेस, मनमाड पंचवटी एक्‍स्प्रेस, तुलसी एक्‍स्प्रेस, छाप्रा एक्‍स्प्रेस, पटना सुविधा, एर्नाकुलम मंगला एक्‍स्प्रेस, दर्भंगा एक्‍स्प्रेस, टाटानगर अंत्योदय एक्‍स्प्रेस या गाड्या विविध मार्गांनी वळवण्यात आल्या होत्या; तर भुसावळ पॅसेंजर, सेवाग्राम एक्‍स्प्रेस, जनशताब्दी एक्‍स्प्रेस, वाराणसी कामायनी एक्‍स्प्रेस, मनमाड-एलटीटी एक्‍स्प्रेस यांची सेवा वेगवेगळ्या ठिकाणाहून खंडित करण्यात आली होती.