मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

मुंबई - परतीच्या पावसाने बुधवारी व आज (गुरुवार) पहाटे मुंबईला झोडपून काढले. अनेक भागांत पाणी साचले होते. रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. पावसामुळे विजेच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू झाला.
 
वडाळा येथे सिग्मा कंपनीजवळील जैन देरासर चाळीत विद्युत दुरुस्तीचे काम करताना बेस्ट उपक्रमाचा कर्मचारी विजेच्या धक्‍क्‍याने होरपळला. केईएम रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. संतोष लाड (वय 47) असे त्याचे नाव आहे. हा कामगार बेस्टच्या दादर येथील प्यूज कंट्रोल रूममध्ये काम करत होता.
 
चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. मंगळवारपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आणि मुंबईचे अनेक भाग जलमय झाले. जोरदार पाऊस सुरू झाल्याने कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, कांजूरमार्ग, मुलुंड, भांडुप, माहीम, माटुंगा, वांद्रे कलानगर, वडाळा, सांताक्रूझ, मालाड आदी ठिकाणी पाणी साचले होते. 24 तासांत शहरी भागांत 84.08 मिलिमीटर, पूर्व उपनगरांत 105.64 मिलिमीटर आणि पश्‍चिम उपनगरांत 110.52 मिलिमीटर पाऊस झाला. रेल्वेच्या उपनगरी सेवेलाही पावसाचा तडाखा बसला. पश्‍चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याने गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिरा धावत होत्या. पूर्व उपनगरांत एक, पश्‍चिम उपनगरांत पाच आणि शहरात पाच अशी 11 झाडे उन्मळून पडली.