वरदहस्तासाठी उत्साहात चोपडीपूजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

आता काळ बदलला आणि हिशेबांच्या वह्यांची जागा संगणकाने घेतली. त्यामुळे आता उच्चशिक्षण घेतलेले तरुण व्यापारी लॅपटॉप, संगणक यांची पूजा करतात. अनेक हौशी व्यावसायिक आपल्याला लक्ष्मी मिळवून देणाऱ्या यंत्रसामग्रीचीही पूजा करतात. अर्थात तरीही काही ठिकाणी अद्याप जुनी परंपरा कायमच असल्याचे दिसत होते.

मुंबई - दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन... आज सर्वत्र आनंदात आणि उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यात आले. फटाक्‍यांचा कमी झालेला आवाज हे यंदाचे वैशिष्ट्य ठरले. पर्यावरणाबाबत होत असलेल्या जनजागृतीचा परिणाम दिसत आहे.

लक्ष्मीपूजन हा दिवस लक्ष्मीची पूजा करण्याचा असतो. पैशाला देवाचे स्थान दिल्याने त्याचा वापर पवित्रपणे करावा. पैसा मिळविताना तो चांगल्या मार्गानेच मिळवावा आणि तो खर्च करतानाही चांगल्या बाबींसाठीच खर्च करावा, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी म्हणून लक्ष्मीपूजन करायचे ही आपली परंपरा. अजूनही घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते, तर व्यापारी लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या आपल्या हिशेबाच्या वह्यांची म्हणजेच चोपडीची पूजा करतात.

अनेक व्यापारी पेढ्यांवर ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी आपल्या हिशेब वह्यांची भक्तीभावाने पूजा केली. दादरच्या स्वामीनारायण मंदिरातही परंपरेनुसार अशा चोपड्यांची पूजा करण्यात आली. शेअर बाजारातही परंपरेनुसार संध्याकाळी साडेसहा ते साडेसातदरम्यान मुहूर्त ट्रेडिंग झाले. घरोघरीही गृहलक्ष्मींनी लक्ष्मीपूजन करून आपल्या घरावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहो, अशी प्रार्थना केली. पूजन झाल्यावर अनेकांनी नवे कपडे घालून सहकुटुंब आप्तेष्ट मित्र यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाविकांनी मंदिरात जाऊनही प्रार्थना केली. महालक्ष्मी येथील मंदिरात दर्शनासाठी आज सकाळपासूनच गर्दी होती. ही रांग हाजीअलीपर्यंत गेली होती.

आवाज कमी
व्यापारी वर्गानेही पूजनानंतर प्रसाद वाटून मर्यादित प्रमाणात आतषबाजी केली. यंदाही एकंदरीतच फटाक्‍यांचा आवाज कमी झाल्याचे जाणवत होते. लक्ष्मीपूजनाचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. काही वर्षापासून फटाक्‍यांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबाबत जनजागृती करण्यात येते. त्यामुळे यंदा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांपेक्षा आतषबाजीच्या फटाक्‍यांना जास्त मागणी आहे. तसेच चिनी फटाक्‍यांविरोधात सोशल मीडियावरून होणाऱ्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्यानेही फटाक्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे.

Web Title: Mumbai seeks blessings