अंधेरीत अल्पवयीन मुलावर 15 मुलांचा लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - पवईत दोन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच अंधेरीतही अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 15 मुलांनी गेल्या वर्षीपासून या मुलावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी 15 जणांविरोधात "पॉस्को' कायद्याखाली डी. एन. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सात मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी डोंगरी बालगृहात केली आहे. अन्य आठ जणांचा शोध घेत आहेत.

पीडित मुलगा अंधेरी परिसरात राहतो. गुन्हा दाखल झालेल्या 15 जणांपैकी काही जण या मुलाच्या परिचयाचे आहेत. गेल्या वर्षी एका मुलाने पीडित मुलाला घरी बोलावले. घरी कुणी नसताना त्याने त्या मुलावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची मुलाला धमकी दिली. हा प्रकार 15 मुलांना समजला. ते सर्व जण या मुलाला धमक्‍या देऊन त्यांच्या घरी आणि खेळण्याच्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार करत होते. काही दिवसांपूर्वी काही जणांनी मुलावर लैंगिक अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने मुलाने याविषयी एका मित्राला सांगितले. भीतीपोटी मुलगा घरी सांगण्यास घाबरत होता. मुलाने स्थानिक "एनजीओ'च्या प्रतिनिधीला याविषयी सांगितले. मुलाच्या पालकांना कळताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.