...आता युती नकोच

shivsena-bjp
shivsena-bjp

मुंबई: राजकीय विचारधारेत साम्य असलेल्या शिवसेना भाजपा युतीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारीही निवडणुकांना सामोरे जाताना एक दिलाने हातात हात घालून गेले अनेक वर्षे काम करताना दिसत होते. मात्र गेल्या अडीच तीन वर्षात सत्तेच्या बाकावर असतानाही या दोन्ही पक्षातील मैत्रीच्या संबंधात कटूता निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. या ताणलेल्या संबंधांवर राज्यातील कॉंग्रेस राष्ट्रवादी या विरोधी पक्षांकडून सेना भाजपाची भांडणेही नवरा बायकोसारखी असल्याची टिका केली होती. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर या भांडणापेक्षा आता घटस्फोट घेतलेला बरा. आता युती नकोच, असा सूर सेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून येवू लागला आहे.

मुंबई महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा 114 चा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपा एकत्र आले तर, सर्व प्रश्‍न निकाली निघू शकतात. परंतु पुन्हा मांडीला मांडी लावून एकत्र बसण्यास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोधी सूर ऐकू येत आहे. मुंबई महापालिकेत गेले 22 वर्षे सेना भाजपाची सत्ता आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच राहिलेला असून, भाजपाला उपमहापौर पदाचा मान दिला जातो.दोन दशकांपेक्षा अधिक काळ निवडणुकीच्या मैदानात सेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून युतीचा धर्म पाळून गळ्यात गळे घालूून प्रचार केल्याचे चित्र मुंबईकरांनी यापुर्वी पाहिलेले आहे. एवढेच नव्हे तर भाजपाचा उमेदवार निवडून आला की, शिवसेनेच्या शाखेसमोरही गुलाल उधळला जात असे.

केंद्रात आणि राज्यात भाजपाला यश मिळाल्यानंतर, मुंबई महापालिकेत आतापर्यंत छोटया भावाची भूमिका करणाऱ्या भाजपाने जागावाटपात समान वाटा मिळावा असा प्रस्ताव ठेवला होता. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने सत्तेत सहभागी होउ नये अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा व्यक्त होती. सत्तेत असतानाही भाजपाकडून सेनेचे खच्चीकरण करण्यात येत असल्याची भावना शिवसैनिकांच्या पचनी पडत नव्हती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत युती तोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शिवसैनिकांकडून उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले होते.

मुंबई महापालिकेत स्वबळावर शिवसेनेला नंबर एकच पक्ष म्हणून स्थान मिळाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपाला पुन्हा युतीत घ्यायला नको. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच व्हायला हवा. त्यासाठी कॉंग्रेसने पाठिंबा दिला तरी तो आम्हाला चालेल, अशी भावना परळ येथील शिवसैनिक भाई जाधव यांनी व्यक्त केली.

कांदिवली चारकोपसारख्या भागात गुजराती, जैन, उत्तरभारतीयांची वस्ती असताना शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी खुप मेहनत घेतली. भाजपाला सोबत न घेता शिवसेनेचा महापौर झाला तर मोठे समाधान लाभेल, असे गेले 40 वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेले प्रमोद मुद्रस म्हणाले. आम्ही जोगेश्‍वरी भागातील विजयी उमेदवारांसोबत आशिर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहे. मुंबई महापालिकेत कॉंग्रेसच्या नेत्यांकडून पाठिंबा देण्याची भुमिका घेतली तर, सेनेने तो घ्यावा. त्याचे आम्हाला काही वाईट वाटणार नाही. फक्त भाजपासोबत जाणे आमच्या स्वाभिमानावर मीठ चोळल्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया जोगेश्‍वरी विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी अनंत भोसले यांनी दिली.

युती नकोच, असा सूर शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून येत असताना, भाजपाच्या कार्यकर्त्यांकडूनही सेनेबाबत पुन्हा युती न करण्यावरच भर असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाची कामे होत आहेत. मुंबईतही रस्ते, रेल्वे, मेट्रोसारखे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. शिवसेनेला सत्तेत घेवून भाजपाने युतीचा धर्म पाळला होता. आता पुन्हा शिवसेनेसोबत युती केली तर, स्थानिक पातळीवरील दादागिरीची भाषा वाढेल. स्वबळावर निवडणुका लढविल्या आहेत. आता सेनेलाही कळू द्या की भाजपासोबत नसेल तर पुढे काय होउ शकते, अशी भावना समस्त भाजपा कार्यकर्त्यांची असल्याचे मत भाजपा चारकोप तालुका अध्यक्ष योगेश पडवळ यांनी व्यक्त केले. सर्वांना घेवून पुढे जात असताना भाजपाला मुंबईत मिळाले आहे. आता आम्हाला शिवसेनेसोबत युती नको आहे, अशी ठाम भूमिका बोरिवलीचे भाजपाचे पदाधिकारी संजय सिंग यांनीही मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com