काम तसे मानांकन; विद्यापीठ ५० वर्षे मागे

काम तसे मानांकन; विद्यापीठ ५० वर्षे मागे

परीक्षा निकालातील गोंधळामुळे चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाचे देशपातळीवरील मानांकन घसरले आहे. देशातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश नसल्याबद्दल तरुणाईने खंत व्यक्त केली. विद्यापीठाला कामाच्या दर्जानुसार योग्य तोच क्रम मिळाला, असा टोला काही जणांनी लगावला. परीक्षांचे ढिसाळ नियोजन, पुरेशी तयारी न करता उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रीन ॲसेसमेंट करण्याच्या निर्णयालाही सर्वांनी दोष दिला. विद्यापीठाने पूर्वीप्रमाणे फक्त पदवी परीक्षांचे नियंत्रण हाती घ्यावे, असेही विद्यार्थ्यांनी सुचवले.

कारभारात बदल होणे आवश्‍यक 
परीक्षांचे निकाल ४० दिवसांत लावणे बंधनकारक असताना त्यासाठी मोठा विलंब लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी प्रवेश घेताना अडचणी येतात. या सर्व गोष्टींमध्ये बदल होणे गरजेचे आहे. 
- धीरज भालेराव, विद्यार्थी, नेरूळ

पेपर तपासणीत सुधारणा व्हावी 
अभ्यासक्रम बदलता राहायला हवा. निकालानंतर मुंबई विद्यापीठाकडून पेपर तपासणीसाठी मागवले तर खूप विलंब लागतो. पेपर तपासणीत अनेक चुका होतात. त्यात सुधारणा होणे आवश्‍यक आहे. 
- नीलेश म्हस्के, विद्यार्थी, नेरूळ

निकालाच्या गोंधळाचा परिणाम 
मी सध्या आयडॉलमध्ये कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. आमचा निकाल आठ महिन्यांनी लागला. पेपर गहाळ होण्याचे प्रकार, परीक्षा वेळेवर न होणे इत्यादीमुळे विद्यापीठाचा दर्जा घसरला असणार. 
-विघ्नेश देवळेकर, विद्यार्थी, पनवेल

विद्यापीठ ५० वर्षे मागे
विद्यापीठाचा ढिसाळ कारभार सुरूच आहे. अधिकाऱ्यांचा फाजिल आत्मविश्‍वास याला कारणीभूत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून इंटरनेटच्या युगात विद्यापीठ किमान ५० वर्षे मागे आहे. 
- वैभव झेंडे, विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ.

ऑनस्क्रीन ॲसेसमेंट जबाबदार
गेल्या वर्षी अचानक घेतलेल्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरला. शिक्षकांना करावी लागलेली तारेवरची कसरत व उशिरा लागलेले निकाल या बाबींमुळे ही घसरण झाली.
- हर्षल जाधव, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले 

दर्जा कायमच राहील
असल्या रॅंकिंगमुळे मुंबई विद्यापीठाच्या दर्जावर परिणाम होणार नाही. येथे शिक्षण घेणे हे मानाचेच आहे. तांत्रिक अडचणीमुळे निकालाला विलंब झाला. माध्यमांनी विद्यापीठाला बदनाम करणे थांबवावे. 
- श्रेया घाग, विकास महाविद्यालय, विक्रोळी

दोन वर्षांपासून घसरण 
दोन वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचा कारभार ढासळत आहे. निकाल उशिरा लागले व काही विद्यार्थ्यांना मास्टर्ससाठी प्रवेश मिळाला नाही. एटीकेटी मिळालेले विद्यार्थी फेरतपासणीत उत्तीर्ण झाले. 
- राहुल कोकरे, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले 

घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांचा फटका
विद्यापीठाने पूर्वीप्रमाणे फक्त टीवायच्याच परीक्षा घ्याव्यात. ऑनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांमुळे विद्यापीठाचे नाव खराब होत आहे.  
- ओंकार पाताडे, जीपीएम महाविद्यालाय, विलेपार्ले

आता तरी विचार करावा...
मानांकन घसरण्यास  विद्यापीठाचा कारभारच जबाबदार आहे. परीक्षांच्या नियोजनातील घोळ, निकालातील हलगर्जी यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. आता तरी विद्यापीठाने विचार करावा. 
- तुषार मवाळ, विद्यार्थी, ठाणे

भरमसाट शुल्क, अपुऱ्या सुविधा
विद्यापीठाचे मानांकन घसरणे ही चिंतेची गोष्ट आहे. विद्यापीठातून हजारो विद्यार्थी दर वर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. या विद्यार्थ्यांकडून शुल्कही भरमसाट घेतले जाते. त्या मानाने पुरेशा सुविधा मिळत नाहीत. 
- कोमल जेठे, विद्यार्थी, ठाणे

शैक्षणिक दर्जा वाढवण्याची गरज
आता गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाहेर शिक्षणासाठी जाताना मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. विद्यापीठानेही शैक्षणिक दर्जा वाढविण्याची गरज आहे.
- गोरख म्हसळे, विद्यार्थी, साकेत कॉलेज, कल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com