पालिकेचे बजेट तीन हजार कोटी

पालिकेचे बजेट तीन हजार कोटी

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीमध्ये आज सादर केला. दोन हजार ९९९ कोटी ४७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पात तब्बल ९७५ कोटी ३७ लाख रुपये वाढ झाली. ही वाढ तब्बल ४८ टक्‍क्‍यांची असून, मालमत्ता करातून ८२५ कोटी रुपये वसूल होण्याचा अंदाज आहे; तर गरिबांना एक हजार लिटरमागे एक रुपया आकारला जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे. प्रतिदिन २०० ते ३५० लिटर प्रतिमाणसी पाणी वापरणाऱ्यांना जास्त दर आकारला जाणार आहे, तर शहरात सर्वत्र लवकरच २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अनेक मार्ग सुकर करण्यात आले असून, टप्पेही कमी करण्यात आले आहेत. सुसज्ज पार्किंग, सुलभ परवाना प्रक्रिया, अद्ययावत नागरी सेवा, घनकचरा व्यवस्थापन, विकसित उद्यान, प्रगत आरोग्य व्यवस्था, शाश्‍वत शिक्षण, दिव्यांग विद्यार्थांचा विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम आदी पायाभूत सुविधांवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. यंदा सादर केलेला अर्थसंकल्प हा शहरात राहण्यासाठी नागरिकांना अधिक आकर्षक, सुरक्षित व आर्थिक सक्षम वाटणारा आहे. अर्थसंकल्पाच्या जोरावर नवी मुंबई महापालिका प्रगतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकेल, असा विश्‍वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.  

मालमत्तांच्या नियोजनासाठी अद्ययावत सर्वेक्षण
मालमत्ता कर वसूल करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, अधिक पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालमत्तांचे ३६० अंश कोनात सर्वेक्षण व्हावे, यासाठी ‘लिडार’ टेक्‍नॉलॉजी वापरून सर्वेक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता कराची बिले चुकती करण्यासाठी ऑनलाईन सेवांसह कॅशलेस सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. 

स्थानिक संस्था कराची सर्वाधिक वसुली
स्थानिक संस्था कराची सर्वाधिक वसुली करण्यात आली. जानेवारीपर्यंतच २११ नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून जुनी थकीत वसुली ६३ कोटी ८७ लाख रुपये वसूल करण्यात आले; तर २०१७ अखेरपर्यंत १५ हजार व्यापाऱ्यांवर करनिर्धारण करण्यात येणार आहे. 

२४ तास पाणीपुरवठा
नवी मुंबईतील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा देण्यासाठी दिघा, ऐरोली, घणसोली, महापे भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो; परंतु त्यांना समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी सात कोटी ८५ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे २५ वर्षांपासून २४ तास पाणीपुरवठ्याच्या प्रतीक्षेत बसलेल्या नागरिकांना पाणी मिळणार आहे. पाणी दरात गरीब घटकांना दिलासा मिळाला असून, एक हजार लिटर पाणी वापरासाठी एक रुपया दर आकारण्यात आला आहे. मध्यम उत्पन्न गटातील रहिवाशांना वापराप्रमाणे जास्तीत जास्त दर आकारले जाणार आहेत, तर वाणिज्य वापराच्या पाणी दरात काही अंशी वाढ करण्यात आल्याने त्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. या माध्यमातून २०१८ ला १३९ कोटी २४ लाख रुपये उत्पन्नाचा अंदाज बांधण्यात आला आहे.    

स्मार्ट पार्किंग
शहरातील वाहतूक कोंडीची व वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी लक्ष केंद्रीत केले असून, सिडकोने हस्तांतर केलेले भूखंड एकत्रित करून सुमारे ८० पेक्षा जास्त भूखंडांवर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. ‘आरएफआयडी’ या तंत्रज्ञानावर आधारित समांतर वाहनतळ व उपलब्ध असलेल्या १४ जागांवर रिक्षा-टॅक्‍सीसाठी वाहनतळ उभारण्यात येणार आहे.   

सुलभ परवाना
महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांना सुलभ पद्धतीने परवाना मिळावा, यासाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन परवाना मागवण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या १२ कागदपत्रांऐवजी ती संख्या पाचवर आणण्यात आली आहे, तर परवाना मिळण्याचा कालावधी ४५ वरून १७ दिवसांचा करण्यात आला. यंदा परवाना विभागातून २५ कोटी १७ लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. 

नगरसेवकांना ५० लाख
नगरसेवकांच्या निधीसाठी वेगळ्या हेडची तरतूद करण्यात आली आहे. नगरसेवकांना ५० लाख रुपयांचा वार्षिक निधी मिळणार असून, आता उपायुक्तांच्या मंजुरीनंतरही हा निधी वापरता येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना निधीसाठी आयुक्तांकडे येण्याची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com