महापालिकेचे पीपीपी तत्त्वावर महाविद्यालय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

ठाणे - विविध नागरी सुविधा व विकास प्रकल्पांचे आधुनिक व्हिजन मांडलेली ठाणे महापालिका आता शिक्षणाच्या आघाडीवरही "पीपीपी' अर्थात पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप मॉडेलद्वारे नवी झेप घेण्यास सिद्ध झाली आहे. खासगी व लोकसहभागातून महाविद्यालय उभारून गरजू विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दर्जेदार मोफत शिक्षण देण्याची पालिकेची योजना आहे. 

ठाणे - विविध नागरी सुविधा व विकास प्रकल्पांचे आधुनिक व्हिजन मांडलेली ठाणे महापालिका आता शिक्षणाच्या आघाडीवरही "पीपीपी' अर्थात पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप मॉडेलद्वारे नवी झेप घेण्यास सिद्ध झाली आहे. खासगी व लोकसहभागातून महाविद्यालय उभारून गरजू विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दर्जेदार मोफत शिक्षण देण्याची पालिकेची योजना आहे. 

महापालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. याचे कारण म्हणजे काही वर्षांपासून या शाळांतील पटसंख्या घसरत आहे. ती वाढविण्यासाठी ई-लर्निंग, सिग्नल स्कूल, कल्पना चावला योजना, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आदींसह विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता विद्यालय उभारण्याची पालिकेची योजना आहे. 

महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची परिस्थितीमुळे होणारी गळती थांबविणे, त्यांना पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे अशी पालिकेची उद्दिष्टे आहेत. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पीपीपी तत्त्वाची संकल्पना पुढे आली. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यांच्या सर्जनशीलतेला व आत्मविष्काराला वाव देण्याचा हेतू यामागे आहे. 

मुंब्रा येथे प्लॅटफॉर्म स्कूल, शैक्षणिक सहकार्य हेतूने विकिपीडियाची मदत, इंग्रजी शाळा सुधार कार्यक्रम, कृतियुक्त अभ्यासक्रम, सेमी इंग्रजी स्मार्ट स्कूलची निर्मिती, विद्यार्थ्यांना टॅब, डिजिटल शाळा, आदर्श शाळा, रात्रशाळा, ज्ञानरचनावाद, गणितीय लॅब, मॉडेल स्कूल आदी नावीन्यपूर्ण योजनाही हाती घेण्यात आल्या आहेत. 

स्मार्ट कार्ड योजना 
महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट आयडी कार्ड योजना सुरू होणार आहे. या शाळांतील विद्यार्थी, तसेच शिक्षकांची उपस्थिती स्मार्ट कार्डद्वारे नोंदवली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा वर्षभरातला गुणवत्ता आलेख, तो शैक्षणिकदृष्ट्या व शारीरिक दृष्टीने कोणत्या स्थितीत आहे, सतत गैरहजर राहण्याची कारणे, गृहपाठ, तसेच भाषा व गणित क्षमतेचा विकास, शालेय उपक्रमात सहभाग आदींचे निरीक्षण या कार्डवर नोंदविले जाणार आहे. 

अशी आहे योजना 
-पीपीपी तत्त्वावर 11 वी, 12 वीपर्यंत उच्च माध्यमिक शाळेची उभारणी. 
-या शाळेत महापालिका शाळेत शिकलेल्या 50 टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश. 
-शाळेसाठी महापालिकेकडून संबंधित शैक्षणिक संस्थेला इमारत व इतर सुविधा पुरविल्या जातील. 
-उच्च माध्यमिक वर्गांचा नियमित अभ्यासक्रम, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची पूर्वतयारी करून घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची असेल. 

Web Title: Municipal College of PPP basis