दूधही गेले अन्‌ चिक्कीही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

मुंबई - महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सुगंधी दूध बाधू लागल्यामुळे चिक्की देण्याचा पर्याय समोर आला होता; मात्र तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांना चिक्की पुरविण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने चिक्कीचा पर्यायही मागे पडला आहे. त्यामुळे महापालिकेच्या या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी तरतूदच न केल्याबद्दल भाजपसह सर्वच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

पालिकेच्या विद्यार्थ्यांना 2007 पासून सुगंधी दूध दिले जात होते; मात्र या सुगंधी दुधामुळे विद्यार्थ्यांच्या पोटात मळमळणे, उलट्या होण्याचे त्रास होऊ लागल्यामुळे या दुधाचे वाटप बंद करण्यात आले. या सुगंधी दुधाला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना चिक्की देण्याचा पर्याय पुढे आला होता. त्यासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती; मात्र एकाच वेळी पालिकेच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांना चिक्की पुरवू शकेल असा कंत्राटदारच मिळत नसल्याने ही चिक्की वर्षभरात विद्यार्थ्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी पालिकेने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा नादच सोडला आहे. 

पालिकेच्या 2017-18 या वर्षाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत पोषण आहार मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. यावरून शिक्षण समितीच्या बैठकीत भाजपच्या सुनीता यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना सर्वच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी साथ दिली. यामुळे आता शिवसेनेविरोधात पोषण आहाराचा मुद्दा तापण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: municipal school