पालिका ठेवणार प्रत्येक थेंबाचा हिशेब!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

मुंबई - टॅंकरमाफियांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेने टॅंकर धोरण आखले आहे. या धोरणानुसार १८ पाणी भरणा केंद्रावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब रोजच्या रोज घेण्यात येणार आहे.

पाणीभरणा केंद्रावर नाईट व्हिजन सीसी टीव्ही बसवण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत ‘तोंडी विनंतीवर’ पाण्याचे टॅंकर न पुरवण्याची तरतूद या धोरणात आहे. प्रत्येक टॅंकरसाठी आरोग्य विभागाचा परवाना पुरवठादाराला घ्यावा लागणार आहे.

मुंबई - टॅंकरमाफियांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेने टॅंकर धोरण आखले आहे. या धोरणानुसार १८ पाणी भरणा केंद्रावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब रोजच्या रोज घेण्यात येणार आहे.

पाणीभरणा केंद्रावर नाईट व्हिजन सीसी टीव्ही बसवण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत ‘तोंडी विनंतीवर’ पाण्याचे टॅंकर न पुरवण्याची तरतूद या धोरणात आहे. प्रत्येक टॅंकरसाठी आरोग्य विभागाचा परवाना पुरवठादाराला घ्यावा लागणार आहे.

मुंबईत दर वर्षी ५०० कोटींचा पाण्याचा काळाबाजार होतो. टॅंकरमालक एक पैसा प्रतिलिटरने पाणी विकत घेऊन ते चार ते पाच रुपये लिटरने विकत असल्याचे आरोप करण्यात येत होते. पालिकेने खासगी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नवे धोरण आखले आहे. पालिकेची सध्या १८ पाणी भरणा केंद्रे आहेत. त्यांची संख्या ५० पर्यंत वाढवण्याचा पालिकेचा विचार आहे. प्रत्येक टॅंकरमालकाला कोठून पाणी भरले आणि ते कोठे पुरवले? याचा हिशोब ठेवावा लागणार आहे. पालिकेची पथके कोणत्याही वेळी या नोंदी तपासू शकतील.

पाणी भरण्यासाठी येणाऱ्या टॅंकरचालकाचे छायाचित्र, टॅंकरचा आणि आरोग्य परवान्याच्या क्रमांकाचे छायाचित्रही काढण्यात येणार आहे. जलमापकातील पाण्याचे प्रमाण आणि टॅंकरमध्ये भरलेल्या पाण्याची रोज पडताळणी करण्यात येणार आहे. त्यात तफावत आढळल्यास तत्काळ चौकशी करण्यात येणार आहे. तोंडी विनंतीवर पाणीपुरवठा न करण्याची कठोर भूमिका प्रशासनाने घेतल्याने लोकप्रतिनिधींना दणका बसला आहे.

पाणी हवे असेल तर...
व्यक्ती किंवा संस्था - जलजोडणीचा पुरावा देयकाच्या प्रतीसह विभाग कार्यालयातील सहायक अभियंता (जलकामे) यांच्याकडे देऊन पाण्याच्या टॅंकरसाठी अर्ज करावा लागेल. 

झोपडपट्टी - जल देयकाच्या प्रतीसह जलजोडणीधारकाला अर्ज करता येईल. 

कार्यक्रम - संबंधित कार्यक्रमाला आवश्‍यक त्या परवानग्या घेतल्याचा पुरावा आणि कार्यक्रमपत्रिका जोडून टॅंकरसाठी अर्ज करावा लागेल.

शुल्क - जलवाहिनी दुरुस्ती वा तांत्रिक कारणाने पाणीपुरवठा झाला नाही तर पाण्यासाठी शुल्क लागणार नाही.

आरोग्य विभागाच्या अटी
पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या टॅंकरवर निळ्या रंगात ‘पालिकेचे पिण्याचे पाणी’ अशी घोषणा लिहणे बंधनकारक आहे. पिण्याव्यतिरिक्त पाणी पुरवणाऱ्या टॅंकरवर ‘पिण्याव्यतिरिक्त पाणी’ असे कोणत्याही रंगात (निळा वगळून) लिहावे लागेल. पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या पुरवठादाराला पिण्याव्यतिरिक्त पाणी पुरवता येणार नाही. पिण्याव्यतिरिक्त पाण्याच्या टॅंकरमधून पिण्याचे पाणी वाहून नेता येणार नाही. टॅंकरच्या चालकाला आणि त्यावर काम करणाऱ्या व्यक्तीला कोणताही संसर्गजन्य आजार नसल्याचे सिद्ध करावे लागेल.

मसुद्यावर सूचना-हरकती 
महापालिकेने नव्या धोरणाचा मसुदा www.mcgm.gov.in  (portal.mcgm.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. त्यावर नागरिकांना १५ एप्रिल दुपारी ४ वाजेपर्यंत सूचना आणि हरकती पाठवता येतील. हरकती किंवा सूचना जलअभियंता खाते, मुंबई महापालिका, पहिला मजला, महापालिका अभियांत्रिकी संकुल, डॉ. ई. मोझेस मार्ग, आचार्य अत्रे चौक, मुंबई - ४०००१८ या पत्त्यावर अथवा hemcgm1@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: municipality will an accounting water drop