पालिका ई-कचरा गोळा करणार! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

ई-कचरा म्हणजे काय? 
इलेक्‍ट्रिकल पार्ट अथवा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू म्हणजे ई-कचरा. उदा. बंद पडलेला टीव्ही, संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोन, मोबाईलचे ईयर फोन, ब्ल्यू टुथ, मोबाईलचे पार्ट, ट्युब, बल्ब, विजेच्या तारा आदींचा ई-कचऱ्यात समावेश होतो. 

नवी मुंबई - कचरा वर्गीकरणात राज्यात अव्वल ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरणात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाप्रमाणे शहरातील ई-कचरा गोळा करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी लाल डबे दिले जाणार आहेत. त्यात हा कचरा न 

टाकणाऱ्यांना नोटीस दिली जाणार आहे. महापालिकेने स्वच्छ भारत सर्वेक्षणात पश्‍चिम भागात अव्वल क्रमांक पटकावल्याची माहिती देण्यासाठी आयुक्त एन. रामास्वामी व महापौर सुधाकर सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. 

नवी मुंबई महापालिका हद्दीत रोज 650 मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील 70 टक्के ओला व सुका असे वर्गीकरण करून क्षेपणभूमीवर नेला जातो. अनेकदा सोसायटीस्तरावरच हे वर्गीकरण केले जाते. तीन ते पाच हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या आकाराच्या सोसायट्यांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र दैनंदिन कचऱ्यासोबत इलेक्‍ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचा ई-कचरा निघण्याचे प्रमाण जास्त आहे. वर्गीकरणात तो वेगळा होत नसल्याने त्याची व्हिल्हेवाट लागत नाही. त्याचे पर्यावरणावर वाईट परिणाम होतात. हा कचरा पुन्हा वापरात आणण्यासारखा असल्याने तो गोळा करण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ई-कचरा निघणाऱ्या सोसायट्या, दुकाने, मोठे शोरूम, औद्योगिक परिसर यावर महापालिका लक्ष केंद्रित करणार आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी लाल रंगाचे डबे वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कचऱ्यातून निघणाऱ्या प्लास्टिकच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करून ऍग्लो तयार केला जात आहे. त्यापासून प्लास्टिकमिश्रित डांबर तयार करून शहरातील दहा रस्ते तयार केले आहेत. या दहा रस्त्यांवर प्लास्टिकयुक्त डांबराचा थर असल्यामुळे त्यांचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे पावसाळ्यात ते खराब होण्याची शक्‍यता नाही. 

नवी मुंबई महापालिकेला पश्‍चिम भागात मिळालेला पहिला क्रमांक टिकवण्यासाठी यापुढे 100 टक्के कचरा वर्गीकरण हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्याच्या पूर्ततेसाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे. 
- एन. रामास्वामी, आयुक्त 

महापालिकेला मिळालेल्या यशात सर्वांचे श्रेय आहे. नवी मुंबईत राहणारा प्रत्येक नागरिक ते रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हे श्रेय आहे. नवी मुंबई आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. 
- सुधाकर सोनवणे, महापौर 

Web Title: The municipality will collect e-waste!