शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणारे पोलिस ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या पत्नी दिपाली ज्ञानेश्‍वर गणोरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई - शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणारे पोलिस ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या पत्नी दिपाली ज्ञानेश्‍वर गणोरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

वाकोला येथील प्रभात कॉलनीत गणोरे यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी घरी गेल्यानंतर त्यांना घर बंद असल्याचे दिसले. त्यांनी पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद होता. त्यांनी दरवाजा उघडला असता पत्नी दिपाली गणोरे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना आढळले. त्यांनी त्वरित 100 क्रमांकाला दूरध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली. वाकोला पोलिसांनी कलम 302 प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शीना बोरा हत्याकांडाचा तपास पथकामध्ये ज्ञानेश्‍वर गणोरे यांचा समावेश आहे.