सव्वीस वर्षांनी पुन्हा भरली त्यांची शाळा !

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

निमोण येथे 'मैत्रबंध' मेळावा ; शालेय आठवणींना उजाळा

तळेगाव दिघे (जि. नगर) : तेच शिक्षक... तेच विदयार्थी.. तोच जोश.. तीच अनुभूती.. तब्बल सव्वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळा भरली. निमित्त होते निमोण (ता. संगमनेर) येथील यशवंत विद्यालयातील १९९१ च्या दहावीच्या वर्गमित्र विद्यार्थ्यांच्या मैत्रबंध मेळाव्याचे. १९९१ ला वेगवेगळ्या वाटांनी गेलेले व वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले वर्गमित्र पुन्हा दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र आले.  

निमोण येथे आयोजित मैत्रबंध मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक एफ. के. शेख होते. देवीचे दर्शन घेत कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यावेळी गावभर पसरलेल्या वर्ग खोल्यांना भेटी दिल्या. वर्गांना भेटी देताना जुन्या आठवणीत सर्वजण रमून गेले होते. ज्या शिक्षकांनी शिकवले त्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह, पुस्तक, शाल व पुष्पगुच्छ देऊन मुलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची आजच्या समाजाला गरज आहे अशा भावना व्यक्त केल्या. शिक्षक बाळकृष्ण कांडेकर, मंगल राशीनकार, प्रताप पवार, राधा बस्ते, उत्तम कडलग, श्रीमती कडलग, पुष्पा कासार, श्री. भोर, पी. पी. वाकचौरे, डी. डी. मैड, मीना लहरे, बाबासाहेब शिंदे, शिवाजी कानवडे, यशवंत विद्यालयाचे सध्याचे प्राचार्य कैलास गुंजाळ यावेळी उपस्थित होते. आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व गुरुजनांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

तत्कालीन मुख्याध्यापक शेख म्हणाले, निमोण परिसरातील विद्यार्थी हा कष्टाळू आहे. इथल्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर आयएएस होऊ शकतात. त्यासाठी या बॅचने पुढाकार घ्यावा.

मेळावा यशस्वी करण्यासाठी रक्षा अनुसंधान मंत्रालया अंतर्गत कार्यरत शास्त्रज्ञ लहानु गिते, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या डीन वंदना बस्ते, बाळासाहेब गाडेकर, ज्योती रोकडे, सुभाष सांगळे, राजू देशमुख, अल्ताब सुभेदार, मनोज वालझाडे, कैलास नागरे, अर्जुन चकोर, असिफ काझी, पांडुरंग गोमासे, मधुकर नागरे या वर्गमित्रांनी परिश्रम घेतले. लहानू गीते यांनी सूत्रसंचालन केले.

भावनिक 'मैत्रबंध' !
'मैत्रबंध' मेळाव्याच्या निमित्ताने सकाळी आठ वाजता भरलेली शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटली, मात्र कुणाचाच पाय शाळेतून निघत नव्हता. शाळा सुटुच नये, अशी भावना सर्वजण व्यक्त करत होते. त्यामुळे 'मैत्रबंध' मेळावा चांगलाच भावनिक ठरला.