तुकाराम मुंढे यांची अखेर बदली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

मुंढे यांची कोठे बदली झाली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मुंढे यांच्या बदलीबरोबरच मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वनविभागाचे संचालक असलेले सुहास दिवसे यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून; तर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून सरकारने नेमणूक केली आहे.

मुंबई - नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुद्रांक शुल्क विभागाचे महासंचालक एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. मुंडे यांच्याबरोबर आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारने केल्या आहेत. 

नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यापासून आयुक्त मुंढे हे त्यांच्या कार्यशैलीमुळे सतत चर्चेचा विषय झाले होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुंढे यांच्या कार्यशैलीबाबत वारंवार आक्षेप नोंदविताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने बदलीची मागणी केली होती; तसेच महापालिकेत मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचाही प्रयत्न झाला होता. मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदा बांधकामास, पदपथावरील आक्रमणास पायबंद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना अनेकांचा विरोध पत्कारावा लागला होता. त्यांच्या बदलीस सामान्य प्रशासन विभागातून दुजोरा मिळत नसला, तरी आज दिवसभरात मंत्रालय आणि विधिमंडळ परिसरात मुंढे यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका वर्तुळात मुंढे यांच्या बदलीस दुजोरा दिला जात आहे. 

मुंढे यांची कोठे बदली झाली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मुंढे यांच्या बदलीबरोबरच मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वनविभागाचे संचालक असलेले सुहास दिवसे यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून; तर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून सरकारने नेमणूक केली आहे.

Web Title: Navi Mumbai commissioner Tukaram Mundhe transferred