कचराकुंड्या होताहेत हद्दपार 

कचराकुंड्या होताहेत हद्दपार 

बेलापूर - कचराकुंडीमुक्त नवी मुंबई करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्यांची संख्या कमी केली जात आहे. त्यामुळे हटवलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने अनोखी शक्कल लढवून तेथे फुलझाडांच्या कुंड्या आणि बसण्यासाठी बाक ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण जवळपास बंदच झाले आहे. 

नवी मुंबई महापालिकेची घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. बेलापूरपासून दिघापर्यंतच्या झोपडपट्टी, गावठाण, सिडकोच्या सोसायट्या, रेल्वेस्थानके, भाजी-फळे मंडई आदी सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या कमी केल्या आहेत. कचराकुंड्या हटविल्यानंतरही त्या जागेवर कचरा पडत असल्याने स्वच्छता विभागाने हा परिसर स्वच्छ करून तेथे ब्लिचिंग पावडरची फवारणी केली व फुलझाडांच्या कुंड्या आणि बसण्यासाठी बाक ठेवले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तेथे कचरा टाकणे बंद केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण आणि अभियांत्रिकी विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढली असल्याने पदपथांवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. गटारे, पदपथ आदी कामे झाल्यावर कंत्राटदार उरलेली खडी, वाळू, माती व डेब्रिज उचलत नसल्याने शहर बकाल होत आहे. कचरा वर्गीकरणासाठी पालिकेने शहरातील पाच हजार 640 सोसायट्यांना 14 हजार 410 कचराकुंड्यांचे वाटप केले आहे. 

वर्ष कचराकुंड्या 
2015 1070 
2016 640 
2018 400 

हरित कचऱ्यात वाढ 
नवी मुंबई महापालिकेतर्फे कचरा वर्गीकरण संकल्पना राबवण्यात येत असून, शहरातून 281 टन ओला, 317 टन सुका आणि 100 टन संमिश्र कचरा गोळा केला जातो. पावसाळ्यात झाडांची केलेली छाटणी, धोकादायक झाडांची पडझड यामुळे हरित कचऱ्यामध्ये वाढ झाली असल्याने 90 टन हरित कचरा जमा होत आहे. 

शहरातील सोसायट्यांमार्फत जसे कचऱ्याचे वर्गीकरण होते, तसे सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याचे वर्गीकरण व्हावे. कचराकुंड्या असलेल्या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास, या गोष्टी लक्षात घेऊन अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या कमी केल्या आहेत. कचरा वर्गीकरण महत्त्वाचे असून नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेसाठी व निरोगी आरोग्यासाठी कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे. 
- तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com