'राष्ट्रवादी'ला प्रतीक्षा कॉंग्रेसच्या 'आवतणा'ची 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. केंद्र आणि राज्यातील युतीत मोठ्या भावाची भूमिका पार पाडणाऱ्या भाजपने थेट पंतप्रधानांना प्रचाराच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही "परिवर्तन रॅली'च्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र मुंबईत हक्काची मतपेढी नसल्याने राष्ट्रवादीला कॉंग्रेसच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून आघाडीसाठी कधी "आवतण' येते याची प्रतीक्षा राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते करीत आहेत. 

मुंबई महानगरपालिकेत केवळ 14 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आगामी पालिका निवडणुकीसाठी जागोजागी "परिवर्तन रॅली'चे आयोजन केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात पक्षाध्यक्षांसह सर्व बडे नेते रिंगणात उतरले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वॉर्डांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना आणि भाजप यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या रॅलीच्या माध्यमातून केले जात आहे. 

एकीकडे राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतली असली तरीही निवडणुकीसाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यास पक्षाचे नेते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांच्यासमोर मुंबईतील सर्व राजकीय परिस्थिती मांडण्यात आली आहे. "शिवसेना आणि कॉंग्रेस यांची पारंपारिक मतपेढी मुंबईत आहे. काही प्रमाणात भाजपनेही काही वॉर्डांमध्ये बस्तान बसविले आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे मुंबईत हक्काची अशी वोटबॅंक नाही. त्यामुळे आघाडी करण्याशिवाय गत्यंतर नाही, ही बाब मुंबईतील नेत्यांनी मांडली होती.' अशा शब्दांत एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. दुसरीकडे कॉंग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम हे यंदाच्या पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अद्यापही आघाडीबाबत प्राथमिक चर्चाच या दोन पक्षांमध्ये झालेली नाही. तेव्हा केवळ चर्चेसाठी कॉंग्रेसचे बोलावणे यावे, या आशेवर रहाण्यावाचून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दुसरा पर्याय नाही. 

मुंबई महानगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल- 
शिवसेना - 82 
भाजप -32 
कॉंग्रेस - 52 
राष्ट्रवादी - 14 
मनसे - 28 
सपा - 9 
इतर - 10