विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे मिलिंद पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक नगरसेवक देणाऱ्या कळवा विभागातील नगरसेवकाला अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा मान देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदाची माळ कळव्यातील नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. यंदा या पदावर महिला नगससेवकाची नियुक्ती होण्यासाठी एक गट क्रियाशील होता; परंतु आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद पाटील यांना ही संधी मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँगेसकडून  मिलिंद पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पाटील हे कळवा येथील प्रभाग २३ ‘अ’मधून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग तिसऱ्यांदा ते निवडून आले आहेत. महापौरपदाची निवड झाल्यानंतर झालेल्या महासभेत विरोधी गटासह सत्ताधारी गटातील महिलांनीसुद्धा महापौर जर एक महिला असेल, तर राष्ट्रवादीनेसुद्धा विरोधी पक्षनेतेपदी महिलेची निवड करावी, अशी मागणी एका गटाने वरिष्ठ नेत्यांकडे केली होती.

त्यासाठी कळव्यातीलच प्रमिला केणी यांचे नाव आघाडीवर होते. त्या सर्वाधिक मताधिक्‍याने तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्‍यता होती. माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते. नजीब मुल्ला यांनीसुद्धा या पदामध्ये विशेष स्वारस्य दाखवले नसल्याचे कळते. आव्हाड गटातील या दोन महत्त्वाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी विशेष स्वारस्य न दाखवल्याने मुंब्य्रातील एका नगरसेवकाचे नाव आघाडीवर होते; मात्र या सर्व चर्चा बाजूला सारून मिलिंद पाटील यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी देण्यात आली आहे. कळवा परिसरातील निवडणुकीत फक्त आपल्या पॅनेलचा विचार न करता इतर पॅनेलमधील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला होता. ही त्यांची जमेची बाजू ठरली असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.