'अविश्वासा'च्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा खो?

- ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर सर्व पक्षांचे बलाबल स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची कोणतीही शक्‍यता दिसत नाही. त्यामुळे लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत राज्य सरकारला धोका पोचणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका माजी मंत्र्याने गुरुवारी (ता.2) दिली. त्यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेसला धक्का बसण्याची शक्‍यता आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजप व त्याखालोखाल शिवसेनेला कौल दिला आहे. आम्ही तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर फेकले गेलो आहोत. सर्वत्र भाजप आणि शिवसेनेचीच चर्चा सुरू असल्याची कबुली या नेत्याने दिली.

मुंबई पालिकेत व विधानसभेत कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होण्याची शक्‍यता नाही. तसे केल्यास ते आम्हालाच धोक्‍याचे ठरेल. त्यामुळेच राज्य सरकार पूर्णपणे स्थिर आहे. सध्या चर्चिल्या जाणाऱ्या अविश्वास ठरावाच्या शक्‍यतांमध्ये काहीही अर्थ नाही, असे या नेत्याने स्पष्ट केले.

कॉंग्रेस काय करणार, हे माहीत नाही. सरकारविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्याचा राष्ट्रवादीचा सध्या विचार नाही. शिवसेना कोणती भूमिका घेते, यावर पक्षाचा निर्णय घेऊ. अविश्‍वासाच्या खेळ्या खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

राष्ट्रवादीचे मन वळवण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न
विधानसभेत बहुमतासाठी 145 संख्याबळाची गरज असते. विधानसभेत भाजपचे 122 सदस्य आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या सदस्यांसह शिवसेनेच्या 63 सदस्यांनी सरकारविरोधी मतदान केल्यास फडणवीस सरकार अल्पमतात येऊ शकते. त्यामुळे सरकार पडू शकते. आकड्यांचा हा खेळ पाहता, राष्ट्रवादीचे मन वळवण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र राष्ट्रवादीने अनुकूल प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई

नवी मुंबई - महापालिकेच्या विधी विभागात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक साखळी तयार झाली आहे. ती महापालिकेची लूट करत आहे...

04.33 AM

नवी मुंबई - वाशी रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी महिलांकडून तीन रुपये घेतले जात आहेत. यामुळे महिलांमध्ये...

04.03 AM

बेलापूर - जुईनगर सेक्‍टर २२ मधील रेल्वे वसाहतीत डेंगीचे १२ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय....

03.45 AM