मिनी ट्रेनला सुरक्षा कवच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नेरळ - वर्षभरापासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घाटमार्गात असलेल्या दरीच्या ठिकाणी मिनी ट्रेनला अपघात होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात आहे. तसेच, आवश्‍यकतेनुसार लोखंडी क्रश बॅरिअर आणि गॅबियनचे सुरक्षा कवच घातले जात आहे. माथेरानच्या पर्यटन व्यवसायासाठी हे सुचिन्ह समजले जात आहे. 

नेरळ - वर्षभरापासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घाटमार्गात असलेल्या दरीच्या ठिकाणी मिनी ट्रेनला अपघात होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात आहे. तसेच, आवश्‍यकतेनुसार लोखंडी क्रश बॅरिअर आणि गॅबियनचे सुरक्षा कवच घातले जात आहे. माथेरानच्या पर्यटन व्यवसायासाठी हे सुचिन्ह समजले जात आहे. 

नेरळ- माथेरान मिनी ट्रेन 8 आणि 9 मे 2016 रोजी रुळावरून घसरल्याने सुरक्षेच्या कारणाने अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. आता 21 किलोमीटरच्या नेरळ- माथेरान मार्गात सुरू असलेली दुरुस्तीची कामे आणि सुरक्षेबाबत होत असलेली उपाययोजना लक्षात घेता मिनी ट्रेन लवकरच नॅरोगेज ट्रॅकवर येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ट्रॅकच्या आजूबाजूला सुरक्षाविषयक अनेक कामांना मंजुरी दिली आहे. प्रामुख्याने एका बाजूला डोंगर आणि समोरच्या बाजूला दरी अशा पद्धतीने मिनी ट्रेनचा नॅरोगेज मार्ग आहे. अपघात झाल्यास मिनी ट्रेन खोल दरीत जाऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. नॅरोगेज मार्गात ज्या ठिकाणी खोल दरीचा भाग आहे, अशा ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरसीसी पद्धतीने सिमेंट खांब उभे केले जात आहेत. प्रत्येकी दोन मीटरवर बसविल्या जात असलेल्या या खांबांना लोखंडी प्लेट लावल्या जात आहेत. प्रामुख्याने घाट रस्त्यात किंवा वळणांवर वाहने जाऊ नयेत म्हणून क्रश बॅरिअर लावले जात आहेत. नट बोल्ट लावून ते बसविले जात आहेत. प्रामुख्याने खोल दरी असलेल्या ठिकाणी ते बसविले जात आहेत. तब्बल तीन किलोमीटर भागात ते उभे केले जात आहेत. 

ज्या ठिकाणी मागील वर्षी आणि त्या आधी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन खोलगट भाग निर्माण झाला होता, त्या ठिकाणी लोखंडी तारांच्यामध्ये दगड घालून केले जाणारे गॅबियन उभारण्याचे काम सुरू आहे. 2005 मध्ये माथेरानच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनानंतर नॅरोगेज मार्गावर अशा प्रकारचे गॅबियन बसविण्यात आले होते. हे गॅबियन 10 वर्षे यशस्वी ठरल्याने रेल्वेने पुन्हा एकदा हेच तंत्र अवलंबिले आहे. 

कामे आणि चाचणीही 
गॅबियन आणि क्रश बॅरिअर यांच्यामुळे नेरळ- माथेरान मिनी ट्रेन अपघातमुक्त होण्यास मदत होईल. गॅबियनसाठी लोखंडी जाळ्या आणि क्रश बॅरिअरसाठी लोखंडी प्लेटचा साठा रेल्वेने नेमलेल्या ठेकेदाराने जुम्मापट्टी येथे करून ठेवला आहे. त्यातून मिनी ट्रेनच्या नॅरोगेज मार्गावर दररोज वेगाने कामे केली जात आहेत. त्याच वेळी मिनी ट्रेनची चाचणी घेतली जात आहे.