गॅसवाहिनीसाठी शेतकऱ्यांना फसवून जमिनीचे पंचनामे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

नेरळ - कर्जत तालुक्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्यासाठी सध्या तीन कंपन्या धावपळ करीत आहेत. काही कंपन्यांच्या मध्यस्थांनी मूळ शेतकऱ्यांना अंधारात ठेवून केलेल्या पंचनाम्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने हे पंचनामे रद्द करण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे.

कंपनीचे अधिकारी कायदा बाजूला ठेवून मध्यस्थांमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हरकती घेतलेल्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवून, स्थानिकांना हाताशी धरून जमिनींचे पंचनामे केले जात आहेत. नेरळ अवसरे भागात स्थानिक पोलिस पाटलाकरवी बोगस पंचनामे केल्याचे आढळून आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्याच वेळी महसूल खात्याचे कर्मचारी गॅस कंपन्यांसाठी दप्तरे घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे.

पुणे तसेच ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या या गॅसवाहिन्या कर्जत तालुक्‍यातून कडाव केंद्रातून पुढे जात आहेत. सरकारने केलेल्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या चारपट दर शेतकऱ्यांना द्यावा, असे केंद्र सरकारचे धोरण आहे; पण कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांची याबाबत मोठी फसवणूक सुरू आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन काही कंपन्या स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून गॅसवाहिनीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.