महापौर झाला, पण सेना-भाजप शीतयुद्ध सुरूच

कुणाल जाधव
बुधवार, 8 मार्च 2017

भाजपने अनापेक्षितपणे केलेल्या मदतीमुळे सेना-भाजपमधील संबंध सुधारतील, असा कयास लावला जात होता. पण नव्या महापौरांनी पहिल्याच भाषणात राज्य सरकारला चिमटे काढले.

मुंबई : भाजपने मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला थेट मदत केल्याने या दोन पक्षांमधील शीतयुद्धाला अर्धविराम मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सेनेच्या नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच भाषणात राज्य सरकारला टोला लगावाला. राज्य सरकारकडे पालिकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचा मुद्दा भाषणात घेऊन शिवसेनेने भाजपसोबतचे युद्ध संपले नसल्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची 83 मते मिळाल्याने तब्बल 171 मतांनी शिवसेनेचा महापौर पालिकेत विराजमान झाला. भाजपने अनापेक्षितपणे केलेल्या मदतीमुळे सेना-भाजपमधील संबंध सुधारतील, असा कयास लावला जात होता. पण नव्या महापौरांनी पहिल्याच भाषणात राज्य सरकारला चिमटे काढले.

राज्य शासनाकडील प्रलंबित थकबाकीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजित प्रकल्पांना मूर्त रूप देणे आर्थिकदृष्टया अडचणीचे होत आहे. त्यामुळे 1999 पासून प्रलंबित असलेली देणी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करेन.' असे आश्वासन नव्या महापौरांनी भाषणात दिले. या उल्लेखामुळे भाजपचे नगरसेवक काहीसे हिरमुसले.
 

Web Title: new bmc mayor takes dig at bjp