सिडकोच्या नैनात बेकायदा इमले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी मुंबई - शहरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटल्याने सिडकोच्या डोक्‍याचा ताप दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईसह पनवेल, उरण परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यामुळे सिडकोने 489 बांधकामांना नोटीस बजावली आहे. 1 जुलै 2016 ते 30 जून 2017 पर्यंत या नोटिसा बजावून कारवाई करण्याचा इशारा सिडकोने दिला आहे; मात्र सिडकोकडून होत असलेली कारवाई तोकडी पडत असल्याने भूमाफियांनी आता सिडकोचे नैना क्षेत्रही लक्ष्य केले आहे. तेथे सर्वाधिक बेकायदा बांधकामे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

नवी मुंबई, पनवेल आणि उरणचा विकास करणाऱ्या सिडकोला सध्या बेकायदा बांधकामांची डोकेदुखी वाढली आहे. सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, कोस्टल रोड, नैना प्रकल्प, शिवडी-न्हावा शेवा सीलिंक अशा मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेक नोडमधील भूखंडांकडे दुर्लक्ष झाले. त्याचा फायदा घेत भूमाफियांनी सिडकोच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे. अशा बांधकामांवर सिडकोकडून कारवाई करते; मात्र सिडकोच्या पथकाची पाठ फिरताच पुन्हा त्या भूखंडांवर पुन्हा बांधकाम सुरू होते. त्यानंतर अनेक महिने सिडकोचे अधिकारी तिकडे फिरकत नाहीत. तोपर्यंत तेथील बेकायदा बांधकामे पूर्ण झाल्याने व तेथे रहिवासी राहत असल्याने अशी बांधकामे पाडताना सिडकोला न्यायालयीन लढाईचा खटाटोप करावा लागतो. सध्या सिडकोच्या जमिनींवरील 489 बेकायदा बांधकामांची यादीच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केली आहे. नवी मुंबईसह दक्षिण नवी मुंबईतील बांधकामांचा त्यात समावेश आहे. अशा बांधकामांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. त्यात कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत. 

बेकायदा बांधकामे दक्षिण नवी मुंबई 
रबाळे, गोठीवली - 23 खारघर - 12 
घणसोली - 75 कामोठे - 07 
ऐरोली - 06 कळंबोली - 40 
कोपरखैरणे - 05 तळोजा - 14 
वाशी - 06 उलवे - 80 
सानपाडा - 03 नवीन पनवेल - 21 
नेरूळ - 34 करंजाडे - 13 
बेलापूर - 30 उरण - 180 

उरणमध्ये सर्वाधिक बांधकामे 
सिडकोने प्रसिद्ध केलेल्या बेकायदा बांधकामांच्या यादीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे दक्षिण नवी मुंबईत असून, एकट्या उरण परिसरात 180 बेकायदा बांधकामे असल्याचे समोर आले आहे. दक्षिण नवी मुंबईत पनवेल-उरण भागात अनेक रहिवाशांनी गरजेपोटी घरे बांधलेली आहेत. अशा बांधकामांमुळे बेकायदा बांधकामांची यादी वाढली आहे. 

नैना वाऱ्यावर 
सिडकोच्या नैना क्षेत्रावर सध्या सिडकोकडून फारसे लक्ष न दिल्याने नैनातील भूखंडावर बेकायदा बांधकाम करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे मुंबई व नवी मुंबईतील नामांकित बांधकाम विकसकांकडून नैना क्षेत्रात बेकायदा बांधकामे करून सदनिकांची विक्री केली जात आहे. त्यामुळे फसवणूक होणाऱ्यांची संख्याही नैनामध्ये जास्त आहे.