नवी मुंबई तापाने फणफणली

नवी मुंबई तापाने फणफणली

नवी मुंबई - सप्टेंबर महिन्यातच ऑक्‍टोबर हिट व अधून-मधून पडणारा पाऊस अशा बदलत्या हवामानाचा फटका नवी मुंबईकरांना बसला आहे. यामुळे १ ते १६ सप्टेंबर या १६ दिवसांत शहरात १६ हजार ६९ जणांना व्हायरल फिव्हरची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी काही भागात डेंगीने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात १६ दिवसांत डेंगीचे १२ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

या वर्षीही वरुणराजाने नवी मुंबईवर कृपादृष्टी दाखवली असली, तरी सप्टेंबरमध्ये हवामानात सतत बदल होत आहेत. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच गायब झालेल्या सूर्यनारायणाने पुन्हा दर्शन देत आग ओकण्यास सुरुवात केली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये उन्हाच्या झळा लागल्याने वातावरणात पुन्हा गरमी निर्माण झाली. यादरम्यान नवी मुंबईचा पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. परंतु मध्येच सायंकाळी व नंतर रात्री पावसाच्या सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण होत आहे. याचा विपरीत परीणाम मानवी शरीरावर होत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे व्हायरल तापाचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. सर्दी-खोकल्यासह तापाचे लक्षणही रुग्णांमध्ये दिसत आहे. शहरातील खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून १ ते १६ सप्टेंबरपर्यंत २८ हजार ३३८ रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात झाली आहे. यातील १६ हजार ६९ जणांना व्हायरल तापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने तब्बल सहा हजार १०५ जणांच्या रक्‍त्यांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ११ जण संशयित हिवतापाचे रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. यात स्वाईन फ्लूवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. १७० स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांपैकी १६४ जणांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. उर्वरित सहा जण उपचार घेत आहेत. चार जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला आहे.

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोठी वाढ
१ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नवी मुंबईतील खासगी व पालिका रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात एकूण तीन लाख दोन हजार ९०२ रुग्णांना तपासण्यात आले. यातील २१ हजार ५८० जणांना व्हायरल फिव्हर असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. मात्र १ ते १६ सप्टेंबर या अवघ्या १६ दिवसांत एकूण २८ हजार ३३८ रुग्णांची तपासणी झाली. त्यात १६ हजार ६९ व्हायरल फिव्हरचे रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com