आरोग्य विभागाला घेतले फैलावर 

आरोग्य विभागाला घेतले फैलावर 

नवी मुंबई - आरोग्य विभागातील महत्त्वाच्या उपकरणांच्या खरेदीचा अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रस्ताव बुधवारी (ता. 28) स्थायी समितीच्या पटलावर आल्यानंतर सर्व पक्षाच्या सदस्यांनी यावरून आरोग्य विभागाला धारेवर धरले. 2016 मध्ये जर उपकरणे खरेदी करण्यासाठी 42 कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती; तर मग उपकरणे खरेदी करायला एवढे महिने का लागले, असा जाब शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला. तेव्हा त्या वेळी निविदेत जाचक अटी असल्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. 

वाशीतील सामान्य रुग्णालयात व्हेंटीलेटर व "क्ष' किरण मशीन खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत पटलावर आला. रुग्णालयातील मशीन बंद पडल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तेव्हा या वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या निविदाकारांपैकी पिनॅकल बायोमेड यशस्वी ठरले असून त्यांना उपकरण खरेदी करण्यासह उपकरण चालवण्यासाठी दोन वर्षे व देखभालीसाठी आठ वर्षे असे 35 लाख 20 हजारांचे कंत्राट देण्याच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र या वेळी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी एवढी वर्षे ही मशीन सुरू राहील का, असा आक्षेप नोंदवला. उपकरणांच्या खरेदीला आधीच मान्यता मिळाली होती. तर मग एवढा वेळ का लागला, असा जाब त्यांनी विचारला. 42 कोटींची मान्यता असूनही उपकरणे खरेदी न करता रुग्णांच्या जीवाशी आरोग्य विभागाने वर्षभर का खेळ केला, असा जाब विचारत शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांनी नापसंती व्यक्त केली. महापालिकेत खुर्चीसाठी कबड्डी खेळण्याचे काम सध्या आरोग्य विभागातील डॉक्‍टरांकडून सुरू आहे. वर्षभर आधी एनआयसीयुतील उपकरणे खरेदी करण्याची मंजुरी मिळाल्यानंतरही रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते, असा आरोप राष्ट्रवादीचे देवीदास हांडे पाटील यांनी केला. प्रशासनाला ठराविक ठेकेदाराला हे कंत्राट द्यायचे होते म्हणून जाचक अटी घातल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला होता की नाही, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम यांच्या तोंडून त्यांनी वदवून घेतले. आरोग्य विभागातील कारभाराबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त एन. रामास्वामी यांच्यासोबत बैठक घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली. तेव्हा आयुक्तांसोबत या विषयावर बैठक घेण्यासाठी यापूर्वीच पत्र दिले असल्याचे सभापती शुभांगी पाटील यांनी सांगितले. 

उशिरा आलेले शहाणपण! 
महापालिकेचा 2015-16 चा प्रशासन व लेखा अहवाल तब्बल दोन वर्षांनी उपायुक्त सुहास शिंदे यांनी स्थायी समितीसमोर सादर केला. यात महापालिकेच्या जमा व खर्चाची तपशील मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र एवढ्या वर्षांनी आणलेल्या अहवालावर चर्चा करून उपयोग काय, असे शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांनी विचारून नाराजी व्यक्त केली. किमान या वर्षाचा अहवाल तरी लवकर सादर करा, अशी मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली. 

वृक्षछाटणी कधी करणार? 
"सकाळ'ने शहरातील वृक्षछाटणीबाबत दिलेल्या बातमीचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवक अशोक गुरखे यांनी शहरात न झालेल्या वृक्षछाटणीबद्दल प्रशासनाला जाब विचारला. अग्निशमन दलाकडे असलेली यंत्रणा जुनी झाली आहे. त्यांना नवी उपकरणे द्या, अशी मागणी त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com