नवी मुंबईला अक्षरशः झोडपले!

नवी मुंबईला अक्षरशः झोडपले!

नवी मुंबई - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपून काढले. मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवार सकाळी ८.३० या २४ तासांत शहरात तब्बल २७५.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून आत्तापर्यंत झालेल्या पावसापैकी गेल्या २४ तासांत झालेला पाऊस सर्वांत जास्त असल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे रात्री बेलापूर व कोपरखैरणेसह नवी मुंबईच्या सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. रात्री ११.४५ च्या सुमारास समुद्राला भरती आली होती. त्यामुळे नवी मुंबईतील काही भागांतील रस्ते पाण्याखाली गेले होते. बेलापूर सेक्‍टर ४ व ५ मध्ये रस्त्यांवर पाणी साचले होते. बेलापूर येथील सेक्‍टर ६ च्या बस डेपोतील रस्तेही पाण्याखाली गेले होते. त्यामुळे बसचालकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. कोपरखैरणे येथे रेल्वेस्थानकाच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे कोपरखैरणेतून ठाणे-बेलापूर मार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागला. कोकण भवनच्या परिसरात पाणी साठले होते. सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत कार्यालय गाठावे लागले. उरण फाट्याजवळ उड्डाणपुलाखाली, सानपाडा रेल्वे भुयारी मार्ग, जुईनगर रेल्वेस्थानकाजवळ सर्व्हिस रोडवर गुडघाभर पाणी साचले होते. जेएनपीटी-उरण मार्गावर नेरूळजवळ एटीएमची कॅश घेऊन जाणारी व्हॅन पावसामुळे बंद पडली होती. पावसासोबत वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने रबाळे, ऐरोली, वाशी, बेलापूर अशा पाच ठिकाणी झाडे उन्मळून कोसळली; परंतु सुदैवाने जीवित व वित्तहानी झाली नाही. कोपरखैरणे येथे एका इमारतीच्या मीटर रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती; मात्र हा प्रकार वेळीच रहिवाशांच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला.

शाळांना सुट्टी
येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी नवी मुंबईतील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर केली होती. या सर्व शाळांना रात्रीच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून कळवल्याने सकाळी शाळा बंद होत्या. सर्व सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला असून, अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घर सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 

सर्वाधिक पाऊस
ऑगस्टमध्ये २९ तारखेला अशाच प्रकारे जोरदार पाऊस झाला होता. त्या वेळी १५० मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली होती; परंतु मंगळवार ते बुधवार या २४ तासांमध्ये २७५.७० मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. वर्षातील तो सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

मोरबे धरणातून विसर्ग 
मोरबे धरणात परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याने धरण पुन्हा वाहू लागले आहे. २४ तासांत धरण क्षेत्रात १८४ मिमी इतका पाऊस झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुधवारी पहाटेपासून ८८.५० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com