राष्ट्रवादीने गड राखला 

राष्ट्रवादीने गड राखला 

नवी मुंबई - नवी मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार २९ मतांनी विजयी झाले; तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनी बाजी मारली. शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार सोमनाथ वास्कर आणि उपमहापौरदाचे उमेदवार द्वारकानाथ भोईर यांना प्रत्येकी ३८ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. उपमहापौरपदाच्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार वैजयंती भगत यांना अवघी तीन मते मिळाली. 

नवी मुंबईचे मावळते महापौर सुधाकर सोनवणे आणि उपमहापौर अविनाश लाड यांचा अडीच वर्षांचा कालावधी ९ नोव्हेंबरला संपल्याने गुरुवारी (ता. ९) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यात आघाडीचे महापौरपदाचे उमेदवार जयवंत सुतार यांना ६७ मते मिळाली; तर शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांना ३८ मते मिळाली. त्यामुळे सुतार यांचा २९ मतांनी विजय झाला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मंदाकिनी म्हात्रे यांना काँग्रेसची सात आणि राष्ट्रवादीची ५७ अशी ६४ मते मिळाली. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांना ३८ मतांवर समाधान मानावे लागले; तर काँग्रेसच्या बंडखोर वैजयंती भगत यांना तीन मते मिळाली. मंदाकिनी म्हात्रे यांना मतदान करताना शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी हात वर केला होता. मात्र ऐनवेळी एका नगरसेवकाला फोन आल्यानंतर काहींनी हात वर केले; तर काहींनी हात खाली घेतले; परंतु नेमके काय करायचे, हे समजत नसल्याने काही वेळ शिवसेनेच्या गोटात संभ्रम होता. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून विजय चौगुले यांचे नाव समोर येत असल्याने घोडेबाजाराला उधाण आले होते. लाखांपासून ते कोटींच्या उड्डाणांचे व्यवहार सुरू होते; मात्र ऐनवेळी गणेश नाईक यांनी बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने २५ वर्षांचा किल्ला अबाधित ठेवला. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

सभागृहात नगरसेवकांचा मान राखण्यात सदैव पुढे असेन. नवी मुंबईतील नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सभागृहात नगरसेवकांकडून मांडल्या जाणाऱ्या सर्व प्रश्‍नांना उत्तरे आणि शंकाचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. 
- जयवंत सुतार, महापौर 

पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्‍वास सार्थकी लावण्यास मी कटिबद्ध आहे. नवी मुंबईच्या नागरिकांचे आणि मला बहुमताने निवडून देणाऱ्या नगरसेवकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अग्रेसर असेन.
- मंदाकिनी म्हात्रे, उपमहापौर

बंडखोरांवर कारवाई होणार?
उपमहापौरपदाच्या निवडणुकीत तीन अर्ज आल्याने या निवडणुकीत रंगत आली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांना साथ देणाऱ्यांवर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे आमदार भाई जगताप यांनी सांगितले.  

विजयातून विकासाची ऊर्जा - गणेश नाईक
नवी मुंबई महापालिकेत सत्ता कायम ठेवल्याबद्दल माजी मंत्री गणेश नाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, असा विजय हा शहराच्या विकासासाठी एक नवीन ऊर्जा देत असतो. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या काही महिन्यांत जो दुरावा निर्माण झाला होता तो कमी झाला आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र काम केले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com