गोल्फ कोर्स तलावाच्या मुळावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

नवी मुंबई - पाम बीच मार्गालगत सिडकोने वसवलेल्या एनआरआय (सीवूडस्‌ इस्टेट) वसाहतीमागील नैसर्गिक तलाव बुजवून, त्यावर गोल्फ कोर्स तयार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. परंतु, येथील रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. हा नैसर्गिक तलाव वाचवण्यासाठी आता आंदोलन उभे राहत आहे. सिडकोने गोल्फ कोर्स केल्यास वसाहतीमागे असलेली तलावातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सिडकोने हा प्रकल्प रद्द न केल्यास त्याविरोधात हरित लवादाकडे जाण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. 

अनिवासी भारतीयांसाठी सिडकोने पाम बीच मार्गालगत फेज-१ व फेज-२ अशा प्रकारांतील वसाहत तयार केली आहे. मात्र, या वसाहतींशेजारील तलावांवर सिडकोला आता काही प्रकल्प उभारायचे आहेत. मात्र, वसाहती शेजारील या तलावांभोवती असलेल्या खारफुटी व तलावात येणारे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांमुळे तलावाला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. पावसाळा व उन्हाळ्यात येथे विलोभनीय दृश्‍य नजरेस पडते. ही वसाहत शहराबाहेर खाडीकिनारी असल्यामुळे व विरंगुळा केंद्र नसल्याने अनेक जण याच ठिकाणी फावल्या वेळात भटकंतीसाठी येतात. एनआरआय वसाहतीमागील तलावांच्या तब्बल २० हेक्‍टरच्या जागेवर गोल्फ कोर्स तयार करण्यासाठी २०१६ पासून सिडकोने नगरविकास विभागाकडून परवानगी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे एनआरआय वसाहतीमागील बाजू विकास क्षेत्र नसल्यामुळे सिडकोने प्रयोजन बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याची कुणकुण वसाहतीमधील नागरिकांना लागल्यानंतर सिडकोच्या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. या भागात गोल्फ कोर्स झाला तरी तलाव नष्ट होऊन तलावाशेजारी असलेली खारफुटीचीही माती खाली जाईल. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या वाटा कायमच्या बंद होतील, अशी भीती येथील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गोल्फ कोर्सला रहिवाशांनी विरोध केला आहे.

एनआरआय वसाहतीमागील बाजू ना विकास क्षेत्र असतानाही गोल्फ कोर्स तयार करून खारफुटी नष्ट करणार आहे. तलाव नष्ट झाल्यास येथे येणाऱ्या फ्लेमिंगोंच्या पाणथळ जागा नष्ट होतील आणि त्यामुळे ते येथे येणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्याविरोधात हरित लवादाकडे तक्रार करणार आहोत.  
- सुनील अगरवाल, रहिवासी

एक प्रकरण न्यायालयात
एनआरआय वसाहतीशेजारी असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलशेजारील तलाव वाचवण्यासाठी नवी मुंबई एनव्हायर्न्मेंट प्रिझर्वेशन सोसायटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या तिच्यावर सुनावणी सुरू असल्यामुळे तलावावर सिडकोकडून टाकण्यात येणारे मातीचे भराव बंद करण्यात आले आहेत.