मुंबई- गोवा महामार्ग जीवघेणाच! 

मुंबई- गोवा महामार्ग जीवघेणाच! 

नवी मुंबई - मुंबई- गोवा महामार्गावर पळस्पे ते खारपाडा पुलापर्यंतच्या रस्त्याची खड्डे पडून अक्षरशः चाळण झाल्याने यंदाही गणेशभक्तांना गचके, दणके खातच कोकणचा प्रवास करावा लागणार आहे. 

पावसामुळे या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. कंत्राटदाराकडून खड्डे बुजवण्यासाठी खडी व मातीमिश्रित वाळू वापरून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम जोमात सुरू आहे; मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांत टाकलेली वाळू अनेक ठिकाणी बाहेर आली आहे. त्यावरून घसरून दुचाकीस्वार पडण्याची दाट शक्‍यता आहे. 

पळस्पेपासून सुरू होणाऱ्या या महामार्गावर पळस्पे चेक पोस्ट ते पळस्पे गाव या परिसरात रस्ता आहे की नाही, अशी शंका वाहनचालकांच्या मनात येते. याठिकाणी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे "रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता' अशी अवस्था झाली आहे. पळस्पेपासून पुढे गेल्यावर जेडब्ल्यूसी वेअर हाउसिंग ते शिरढोण गावापर्यंत दोन्ही मार्गिका सुरू असून रस्ता चकचकीत आहे; परंतु पुन्हा शिरढोण गावाच्या थांब्यापासून ते चिंचवणपर्यंत खड्ड्यांची मालिका सुरू होते. ती कर्नाळ्याच्या आधी कामत हॉटेलपर्यंत सुरूच राहते. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यासाठी काही भागात पेव्हर ब्लॉक, तर काही ठिकाणच्या खड्ड्यांत रस्त्यावरचे उखडलेले जुनेच डांबर टाकले जात असल्याचे "टीम सकाळ'च्या लक्षात आले. या ठिकाणाहून पुढे कल्हे गावापर्यंतच्या वळणावर रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात आता कंत्राटदाराला रखडलेल्या दुसऱ्या मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे सुचले आहे, त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच जेसीबी व ट्रक थांबून अधूनमधून वाहतूक कोंडी होते. युसूफ मेहेरअली सेंटर ते तारा गावापर्यंत कोकणच्या दिशेने जाणारी एक मार्गिका तयार आहे; परंतु तिच्यावरून वाहतूक सुरू न केल्याने दोन्ही दिशेकडच्या वाहनांना एकाच मार्गिकेवरून जावे लागत आहे. 

महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. पाऊस पडत असल्याने खड्ड्यांत वाळू व खडी टाकून बुजवण्याचे काम केले जात आहे. पावसाने साथ दिली, तर तत्काळ डांबरीकरणाने खड्डे बुजवण्यात येतील. 
- अभिषेक अग्रवाल, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) 

जुनेच डांबर! 
कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणच्या खड्ड्यांत रस्त्यावरचे उखडलेले जुनेच डांबर टाकले जात असल्याचे "टीम सकाळ'च्या लक्षात आले. याबाबत संबंधित कामगाराला हटकल्यानंतर त्याने सारवासारव करत पळ काढला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com