मोरबेच्या पाणीपातळीत वाढ

मोरबेच्या पाणीपातळीत वाढ

नवी मुंबई - आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातील पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत ६८ मीटर एवढी पाणीपातळी धरणात होती; परंतु या वेळी ती ८१.२ मीटर आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण कायम राहिले, तर आठवडाभरात धरण भरून वाहण्याची शक्‍यता आहे, असे अभियांत्रिकी विभागाकडून सांगण्यात आले.  

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणीसाठवण क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. आठवडाभरापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आठवडाभरात तब्बल ४७५ मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन १३० ती दशलक्ष घनमीटर झाली. धरणातील जलसाठ्याने ८१.२ मीटर एवढी उंची गाठली आहे. ८४ मीटर उंची गाठल्यानंतर धरण भरून वाहू लागते. त्यामुळे हे धरण भरून वाहण्यासाठी आणखी तीन मीटरची गरज आहे.

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला, तरी मोरबे धरण भरून वाहिले नव्हते. गेल्या वर्षी जुलैमध्ये मोरबे धरण परिसरात ११४१.४० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे धरणाची पाणीपातळी फक्त ७०.२ मीटरपर्यंतच पोहचू शकली होती; परंतु या वेळी १७७० मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात तब्बल ६० टक्के पाऊस जुलैच्या मध्यापर्यंत झाला आहे. त्यामुळे आठवडाभर पावसाचा जोर असाच राहिला, तर धरण भरून वाहू शकेल.

जलपूजनाची संधी मिळणार?
माथेरान डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या मोरबे धरणात वर्षभर पुरले इतका पाणीसाठा झाला आहे; परंतु चार वर्षांपासून हे धरण भरून वाहिलेले नाही. धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर जलपूजन करण्याची परंपरा आहे. ती संधी या वेळी पालिकेला मिळण्याची शक्‍यता आहे.

५४.६७ मिमी पाऊस
नवी मुंबईत सोमवारी सायंकाळी ६.३० पर्यंत ५४.६७ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यात बेलापूर- ४८.९, नेरूळ- ५५.३, वाशी- ६४.५ व ऐरोलीत ५० मिमी इतका पाऊस पडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com