नवी मुंबई होणार हिरवीगार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

बेलापूर - नवी मुंबई महापालिका या पावसाळ्यात शहरात सुमारे ४० हजार रोपांची लागवड करणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. यामुळे शहरात हरित क्रांती होणार असली तरी या रोपांची निगा राखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. कारण गेल्या वर्षी केलेल्या रोप लागवडीतील ५० टक्केच रोपे जगली आहेत. त्यामुळे पालिकेचा अर्धा खर्च वाया गेला आहे.

बेलापूर - नवी मुंबई महापालिका या पावसाळ्यात शहरात सुमारे ४० हजार रोपांची लागवड करणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. यामुळे शहरात हरित क्रांती होणार असली तरी या रोपांची निगा राखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. कारण गेल्या वर्षी केलेल्या रोप लागवडीतील ५० टक्केच रोपे जगली आहेत. त्यामुळे पालिकेचा अर्धा खर्च वाया गेला आहे.

आगळेवेगळे उपक्रम राबवून राज्य आणि देशातील इतर पालिकांसमोर आदर्श ठेवण्यात नवी मुंबई महापालिका नेहमीच अघाडीवर असते. दर वर्षी पावसाळ्यात पालिकेमार्फत रोप लागवड केली जाते; परंतु योग्य नियोजनाअभावी रोपांचे संवर्धन करण्यात ती अपयशी ठरते. पालिकेने गेल्या वर्षी पारसिक हिल, दिघा टेकडी, महामार्गालगतच्या अशा अनेक ठिकाणी सुमारे २० हजार रोपे लावली होती; परंतु त्यांचे योग्य नियोजन केले नसल्याने जवळपास ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रोपे मेली. त्यामुळे या वेळी हा प्रकार टाळण्यासाठी पालिकेने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात रोप लावण्यापासून अडीच वर्षे त्यांची निगा राखण्याचे नियोजन केले आहे. 

यात प्रामुख्याने सहा ते आठ फूट उंचीचे रोप, खड्डा खणणे, रोप लावून माती व खत टाकणे यासाठी रोपामागे ३५० रुपये पालिका खर्च करणार आहे. याबरोबरच रोपांची ३० महिने निगा राखण्यासाठी दरमहा प्रत्येक रोपासाठी १४ रुपये खर्च करणार आहे. काही दिवसांत या कामाची निविदा पालिका काढणार आहे. यात प्रामुख्याने भारतीय वातावरणाला साजेशा रोपांचा समावेश केला जाणार आहे. त्यात वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, काजू, बदाम, गुलमोहर, बहावा यांचा समावेश केला जाणार आहे. रोप लागवड करताना भविष्यात त्यांचा अडसर निर्माण होऊ नये याचीही खबरदारी घेतली जात आहे. उद्यानांच्या कडेला, ट्री-बेल्ट, महामार्गालगतची रिकामी जागा, शाळांच्या मैदानांशेजारी, नाल्यालगत आदी ठिकाणी ही रोपे लावण्यात येणार आहेत. ४० हजार रोप लागवडीचा एक भाग म्हणून रबाळे आंबेडकरनगर येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या प्रांगणात आणि मुंबादेवी डोंगरावर महापौर सुधाकर सोनवणे यांच्या पुढाकारातून पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि शिक्षक व विद्यार्थ्यांनी ३५० हून अधिक रोपांची लागवड केली. 

गेल्या वर्षी पालिकेने सुमारे २० हजार रोपांची लागवड केली होती; परंतु नियोजनाअभावी ५० टक्के रोपे जगली. ही परिस्थिती या वेळी उद्‌भवू नये यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. नुसती रोप लागवड न करता जास्तीत जास्त रोपे कशी जगतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- तुषार पवार, उपायुक्त