सायन - पनवेल महामार्ग खड्ड्यांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नवी मुंबई - मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाची परिस्थिती मागील वर्षापासून ‘जैसे थे’च आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे. कळंबोली सर्कलपासून या मार्गाला सुरुवात होत असून येथूनच खड्डे दिसू लागतात. वाशी टोल नाका संपेपर्यंत खड्डेमय प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर तयार केलेल्या उड्डाणपुलांखाली रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. 

कळंबोली सर्कल, सीबीडी-बेलापूर सर्कल, नेरूळ येथील सर्कल, सानपाडा उड्डाणपूल, वाशी सर्कल व वाशी गाव येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची खोली मोठी असून काही खड्डे तर एक फूट खोल असल्याचे आढळून आले आहे. कळंबोली सर्कलजवळ काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व खड्‌डे बुजवले होते. मात्र शनिवारपासून पावासाने सार्वजनिक विभागाने केलेले तकलादू काम उखडले. पुन्हा रस्ता खड्डेमय झाला. दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यांमध्ये आदळत आहेत. अचानक येणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा तोल जात असल्याने अपघाताची शक्‍यता वर्तवली जात आहे. या खड्ड्यांमुळे मणक्‍याचे आजार बळावण्याची शक्‍यता असते.