जुईनगरमधील उद्यानाच्या नावाचा वाद सोशल मीडियावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

बेलापूर - जुईनगर सेक्‍टर 24 मधील उद्यानाला आंबेडकरी संघटनांनी "माता रमाबाई आंबेडकर' असे नाव दिल्यावर तेथील नगरसेवकाने "क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' असे उद्यानाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव प्रभाग समितीच्या बैठकीत मांडला आहे. हा वाद आता सोशल मीडियावर गेला आहे. तेथे नवी मुंबई शहराच्या जडणघडणीत ज्यांनी प्राणाची आहुती दिली अशा प्रकल्पग्रस्तांची नावे नवी मुंबईतील वास्तूंना दिली पाहिजेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

जुईनगरमधील आरक्षित भूखंडावर उद्यानाचे काम सुरू आहे. त्याला संरक्षक जाळी बसवली असून, आतील कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. असे असताना त्याच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. त्यात आता प्रकल्पग्रस्तांनीही उडी घेतली आहे. नवी मुंबई शहराच्या आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी बलिदान दिले त्यांची आठवण कायम राहावी, त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी शहरातील वास्तूंना बलिदान दिलेल्या भूमिपुत्रांची नावे द्यावी, अशी मागणी व चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. जुईनगरमधील या भूखंडावर उद्यानाऐवजी खेळाडूंसाठी मैदान तयार करावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. 

नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी अनेक भूमिपुत्रांनी बलिदान दिले. त्यांची नावे शहरातील वास्तूंना देण्यात यावीत. या उद्यानाच्या जागेवर मैदान तयार करावे. त्याचा फायदा खेळाडूंना होईल. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजूर झाला आहे. 
- दिनेश ठाकूर, उपाध्यक्ष, शिरवणे ग्रामविकास युवा मंच