वाशी होणार हिरवीगार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नवी मुंबई  - वाशी भागात हरित क्षेत्रविकास करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला असून त्यासाठी दोन कोटी तीन लाख खर्च करण्यात येणार आहेत. 

नवी मुंबई  - वाशी भागात हरित क्षेत्रविकास करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला असून त्यासाठी दोन कोटी तीन लाख खर्च करण्यात येणार आहेत. 

वाशीतील सेक्‍टर 10, स्वामी नारायण वॉटर पार्क व सेक्‍टर 30 "ए' येथील भूखंड क्रमांक 45 येथे केंद्र सरकारपुरस्कृत अमृत अभियानांतर्गत हा हरित क्षेत्र विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रातर्फे एक कोटी पालिकेला मिळणार आहेत. हरित क्षेत्राच्या विकासासाठी प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने पालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने मे. असिम गोकर्ण (लॅण्डस्केप) सल्लागार यांच्याकडून हा विकासकामाचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करून घेतले आहे. या हरित क्षेत्राचा विकास करताना शहरातील हवामान, पाण्याची उपलब्धता व भौगोलिक परिस्थिती यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरातील पशू-पक्ष्यांचा अधिवास व अन्नसाखळी टिकून राहील आणि जैविक विविधतेचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होणार आहे. जैविक उष्णतेचे वाढणारे प्रमाण व हवामानातील बदल यांची तीव्रता आणि परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल या प्रकल्पामुळे टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. अमृत अभियानांतर्गत हरित क्षेत्रविकासाच्या जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने आवळा, वेल, बहावा, पांगरा, पळस, सावर, वड, उंबर, कदंब, चाफा आदी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर फुलझाडे व हिरवळ तयार केली जाणार आहे. तसेच नागरिकांना फिरण्यासाठी नैसर्गिक पदपथ, प्रवेशद्वार, कुंपणाची भिंत, कचऱ्याचे डबे आदी कामांचा यात समावेश आहे. त्यासाठी दोन कोटी तीन लाख खर्च होणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.