पळस्पेपासूनच दणके सुरू 

पळस्पेपासूनच दणके सुरू 

नवी मुंबई  -मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते खारपाडा पुलापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याने यंदाही गणेशभक्तांना गचके, दणके खात कोकणचा प्रवास करावा लागणार आहे. 

कंत्राटदाराकडून खड्डे बुजवण्यासाठी खडी व मातीमिश्रित वाळू वापरून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे; मात्र पावसामुळे खड्ड्यांत टाकलेली वाळू बाहेर आली आहे. त्यावरून घसरून दुचाकीस्वार पडण्याची दाट शक्‍यता आहे. पळस्पेपासून कल्हेपर्यंत एकच मार्गिका सुरू असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. दर वर्षी गणपतीच्या पार्श्‍वभूमीवरच राज्य सरकारला मुंबई-गोवा महामार्गाची आठवण येते. पळस्पेपासून सुरू होणाऱ्या या महामार्गावर पळस्पे चेक पोस्ट ते पळस्पे गाव या परिसरात रस्ता आहे की नाही, अशी शंका वाहनचालकांच्या मनात येते. पळस्पेपासून पुढे गेल्यावर जेडब्ल्यूसी वेअर हाऊसिंग ते शिरढोण गावापर्यंत दोन्ही मार्गिका सुरू असून रस्ता चकचकीत आहे; परंतु पुन्हा शिरढोण गावाच्या थांब्यापासून ते चिंचवणपर्यंत खड्ड्यांची मालिका सुरू होते. ती कर्नाळ्याच्या आधी कामत हॉटेलपर्यंत सुरूच राहते. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यासाठी काही भागात पेव्हर ब्लॉक, तर काही ठिकाणच्या खड्ड्यांत उखडलेले जुनेच डांबर टाकले जात असल्याचे ‘टीम सकाळ’च्या लक्षात आले. या ठिकाणाहून पुढे कल्हे गावापर्यंतच्या वळणावर रस्ताच राहिलेला नाही. 

पावसाळ्यात कंत्राटदाराला रखडलेल्या दुसऱ्या मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे सुचले आहे. 

महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. पाऊस पडत असल्याने खड्ड्यांत वाळू व खडी टाकून बुजवण्याचे काम केले जात आहे. 
- अभिषेक अग्रवाल, प्रकल्प व्यवस्थापक,  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई)  

बाईक प्रवास टाळाच
पळस्पे ते खारपाडादरम्यान महामार्गावरील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या मार्गावर अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी वाळू रस्त्याच्या कडेला येऊन साचली आहे. रात्री मोठ्या वाहनांचे प्रकाशझोत दुचाकीस्वारांच्या डोळ्यावर येतात. त्यामुळे खड्ड्यातील वाळूवर घसरून अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे.

जुनेच डांबर!
कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणच्या खड्ड्यांत रस्त्यावरचे उखडलेले जुनेच डांबर टाकले जात असल्याचे ‘टीम सकाळ’च्या लक्षात आले. याबाबत संबंधित कामगाराला हटकल्यानंतर त्याने सारवासारव करत पळ काढला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com