पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळाले! 

पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळाले! 

नवी मुंबई - मे महिन्यात शहराला पाणीपुरवठा करण्याची पनवेल महापालिकेने केलेली मागणी नवी मुंबई महापालिकेने मंगळवारी (ता. 20) फेटाळली. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांचे जादा पाण्याचे स्वप्न धुळीला मिळाले असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामाकाजात पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुकापूरजवळ जलवाहिनीला जोड देण्याचा प्रस्ताव आला होता. महापौर सुधाकर सोनवणे यांनी तो मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवला तेव्हा तो बहुमताने फेटाळण्यात आला. यामुळे मे महिन्यात पुन्हा पनवेल महापालिकेला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. 

पनवेल पालिकेचे मालकीचे धरण असले, तरी त्याची खोली व पाणी साठवण्याची क्षमता कमी असल्यामुळे शहराला सिडको, एमआयडीसी व जीवन प्रधिकरण अशा तीन सरकारी संस्थांवर पाण्यासाठी अवलंबून रहावे लागते. मे महिन्यात तर पनवेलकरांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यात घट होऊन मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पनवेल शहराच्या अनेक भागांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. पनवेलला दररोज हव्या असलेल्या 27 एमएलडी पाण्याची गरज देहरंग धरण, सिडको, एमआयडीसी व जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांमधून कशीबशी भागवली जाते; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीच्या जलवाहिन्या फार जुन्या असल्यामुळे खराब होत चालल्या आहेत. अशात एखादी दुर्घटना घडल्यास पनवेलकरांना कायमचे पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पनवेल शेजारून जलवाहिन्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाचे पाणी मिळाल्यास पनवेलची तहान भागू शकते, अशी कल्पना पुढे आली होती. पनवेल महापालिकेला कमी पडत असलेले पाच एमएलडी पाणी नवी मुंबईने दिल्यास पनवेलकरांची तहान भागणार होती. त्यामुळे पनवेल महापालिकेने दररोज पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेकडे पाठवला; मात्र याचदरम्यान तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने हा प्रस्ताव पडून राहिला. नंतर आलेले आयुक्त एन. रामास्वामी सुट्टीवर गेल्याने त्यांचा अतिरिक्त कारभार पाहणारे पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पुढाकार घेत अभियांत्रिकी विभागाला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला सुकापूरजवळ 150 एमएम व्यासाच्या जलवाहिनीने जोडण्यात येणार होती. या नळजोडणीतून एप्रिल ते 15 जूनपर्यंत 5 एमएलडी पाणी 9 रुपये प्रति एक हजार लिटर दराने देण्याचे प्रस्तावित होते; मात्र हा प्रस्ताव आज पटलावर आला असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी बहुमताने फेटाळून लावला. महापालिकेच्या या निर्णयामुळे पनवेलकरांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. 

शिवसेना-भाजपची बघ्याची भूमिका! 
पनवेल महापालिकेला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीला सादर केल्याच्या काही मिनटिांतच हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. या वेळी शिवसेना व भाजपचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. त्यांना काही कळायच्या आतच हा प्रस्ताव नामंजूर झाल्याने युतीचे नगरसेवक बघ्याची भूमिकेत राहिले. 

निंबाळकरांना दणका! 
पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काही दिवसांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर प्रभारी पदभार मिळाला होता. त्यादरम्यान त्यांनी थेट अधिकाराचा वापर करून मोरबे धरणाचे पाणी पनवेलला देण्याचा निर्णय घेत अभियंत्रिकी विभागाला पाणीपुरवठा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. 

पनवेल शहराला कायम पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पनवेलला असलेली पाण्याची गरज भागवण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नवी मुंबईकडे पाण्याची मागणी केली होती; परंतु नवी मुंबईने ती का फेटाळली, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. 
- सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल पालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com