कोपरखैरणेत कचराच कचरा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

याबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती पावले उचलली जातील. यात जर कोण कामचुकारपणा करत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
- तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा विभाग 

कोपरखैरणे -  सध्या नवी मुंबईत सर्वत्र साथींच्या रोगांनी थैमान घातल्याने पालिका आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. मात्र, कोपरखैरणेत उलटे चित्र असून विभागीय स्तरावर डासांच्या उत्पत्तीस्थानांत वाढ झाली आहे. त्याकडे पालिका साफ दुर्लक्ष करीत आहे. येथे ठिकठिकाणी पडलेला कचरा पावसामुळे कुजला आहे. येथे कंत्राटदारांनी ठेवलेल्या पिंपात पावसाचे पाणी साचल्याने परिसरात घाण व दुर्गंधी पसरली असून डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. त्यामुळे परिसरात साथींचा फैलाव झाला आहे. 

नवी मुंबईत साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना काही ठिकाणी त्यावर उपाययोजना करण्याऐवजी दुर्लक्ष केले जात आहे. शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. खासकरून कोपरखैरणेतील उद्याने आणि मैदाने ही जणू डम्पिंग ग्राऊंड बनली आहेत. याबाबत कचरा वाहतूक करणाऱ्या कामगारांना विचारले असता, आम्ही केवळ घरातून आणलेला कचरा आणि कचराकुंडीतील कचराच गोळा करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मैदाने, उद्याने व अन्य सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा कुणी उचलायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यात सर्वाधिक कचरा संतोषीमाता मैदानात आहे. कोपरखैरणेमध्ये केवळ दोन मैदाने आहेत. त्यातील एक पार्किंग झोन तर दुसरे कचरा आगर बनले आहे. 

सेक्‍टर 19 येथे कंत्राटदाराचे साहित्य पडले आहे. त्यात सळ्या, सीलिंग रॉड, पाण्याचे पिंप आदींचा समावेश आहे. सध्या पाऊस पडत असल्याने हे भंगार सामान डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. त्याकडे पालिकेचे अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत. 

Web Title: news mumbai news Kopar Khairane garbage