निरुपम-कामत वाद पुन्हा उफाळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

मुंबई - पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील कामत- निरुपम गटातील मतभेद पुन्हा उफाळले आहेत. मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे, असा आरोप कामत यांनी केला असून उमेदवार निवड प्रक्रियेतून आपण बाहेर पडत आहोत, तसेच प्रचारापासून दूर राहणार असल्याचा ‘मेसेज’ आपल्या समर्थकांना त्यांनी पाठवला आहे. उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच या दोघांमधील वादाला तोंड फुटले आहे. 

निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसमधील कामत-निरुपम यांच्यामध्ये जोरदार चुरस सुरू होती. त्यामुळे गटातटातील मतभेद मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी काँग्रेसने समिती नियुक्त केली आहे. या समितीत कामतही आहेत. मात्र आपल्याला सतत डावलले जात असून निरुपम यांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे, असे म्हणत कामत यांनी नाराजी पुन्हा व्यक्त केली आहे.  कामत यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कंटाळून राजीनामा देत समर्थकांसह मुंबई पक्ष कार्यालयासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यामध्ये माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश होता. शक्तिप्रदर्शनानंतर कामत व त्यांच्या समर्थकांची थेट दिल्लीतून नाराजी दूर करण्यात आली. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ५२ नगरसेवक असून विरोधी पक्षनेता काँग्रेसचा आहे. यातील निम्मे म्हणजे जवळपास २५ नगरसेवक कामत गटाचे आहेत. गटातल्या वादानंतर निरुपम यांनी कामत गटाचे नगरसेवक देवेंद्र आंबेरकर यांना हटवून प्रवीण छेडा यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसवले. त्यामुळे कामत गटात समर्थकांमध्ये अंतर्गत खदखद कायम राहिली. या गटातील दुफळीचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या गटबाजीचा काँग्रेसला फटका बसण्याची दाट शक्‍यता आहे. 

Web Title: nirupam-kamat political dispute