‘सौं’च्या प्रचारात ‘श्रीं’ची धूम!

श्रीकांत सावंत - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

उत्तर भारतीय महिला उमेदवारांच्या पतिराजांची प्रचारातील लुडबूड तर उमेदवारालाही लाजवणारी आहे...

ठाणे -  महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू करण्यात आले असले, तरी त्याचा फायदा अनेक राजकीय नेत्यांनी आपल्याच घरातील महिलांना उमेदवारी मिळवण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे महिलांना उमेदवारी मिळाली असली, तरी त्यांच्या प्रचारामध्ये पतिराज आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने उत्तर भारतीय महिला उमेदवारांच्या पतिराजांची प्रचारातील लुडबुड तर उमेदवारालाही लाजवणारी आहे. काही पतिराज तर उमेदवार पत्नीला प्रचारापासून दूर ठेवत स्वत:च प्रभागातील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. 

प्रचारामध्ये मतदारांपासून दूर असलेल्या ‘सौ.’ जिंकून आल्यास त्यांच्या प्रभागाची सगळीच सूत्रे पतिराजांकडे राहणार असल्याचा अंदाज आत्तापासूनच मतदारांना येऊ लागला आहे.  

पालिकेच्या सभागृहातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महिला आरक्षणांचे प्रयत्न झाले. त्यानुसार आरक्षणसुद्धा लागू झाले. महिलावर्गाकडून आरक्षणाचा फायदा करून घेत आपले प्रस्थ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच राजकारणातील पुरुषांची मक्तेदारी मोडण्यात महिला काहीशा कमी पडत आहेत. प्रत्येक पक्षाने पती किंवा मुलगा यांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक वजन पाहूनच महिलांना उमेदवारी दिल्याचे दिसते. यापैकी काही सन्माननीय अपवाद असले, तरी ही संख्या अत्यंत तुरळक आहे. यामुळे उमेदवार महिला असली तरी पती किंवा मुलगाच या प्रचारातील खरा सूत्रधार असतो. कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी न झालेल्या या उमेदवार महिला राजकीय अपरिहार्यतेमुळे प्रचारामध्ये उतरत आहेत. 

महिलांना मज्जाव
स्त्री-पुरुष समानतेत मुंबईशी स्पर्धा करणाऱ्या ठाण्यात अनेक ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांची वस्ती आहे. अशा भागात आजही महिलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. राजकीय अपरिहार्यतेमुळे अनेक राजकारण्यांनी पत्नी किंवा घरातल्या महिलेला निवडणुकीत उतरवले आहे. मात्र त्यांना प्रचार करण्यासाठी घराबाहेर पडण्यासही मज्जाव करण्यात आल्याचे काही भागातील स्थानिकांनी सांगितले. अनेक मोठ्या राजकीय पक्षांमधील महिला उमेदवारांचे रॅलीतील दर्शन पुरुषांच्या मक्तेदारीमुळे कमी होत आहे. 

प्रभागातील कामे मी करतो; मात्र आरक्षण पडल्यामुळे पत्नीला उमेदवारी द्यावी लागली. तुमची कामे मीच करणार आहे. त्यामुळे मीच प्रचारासाठी प्रभागांमध्ये फिरत आहे. पत्नीला निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
- महिला उमेदवाराचा पती, वागळे इस्टेट

Web Title: North Indian Women candidates husband Interference in campaign