मोदींची गुलामगिरी स्वीकारणार नाही- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

राज ठाकरे यांनाही चिमटा 
बाळासाहेबांच्या नावावर महापौर बंगल्याची जागा हडपायची आहे, बाळासाहेबांच्या नावावर भ्रष्टाचार चाललाय असे "दुसरे' म्हणत आहेत. मग, युती करायला कशाला आला होता, असा टोलाही उद्धव यांनी राज ठाकरे यांना लगावला. 

मुंबई - महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका फोल मुख्यमंत्री मिळाला आहे. नमामी गंगेचे पैसे गेले कोठे, असा परखड सवाल विचारत महाराष्ट्र मोदींची गुलामगिरी स्वीकारणार नाही. 23 फेब्रुवारीला त्यांना औकात दिसेल, अशा कडवट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रहार करत शिवसेनेच्या प्रचाराचा समारोप केला. 

वांद्रे कुर्ला संकुलात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी तोफ डागली. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या, म्हणून कोणतीही अट न ठेवता त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र ते पक्षाची धुणी धुण्यात व्यग्र आहेत. पक्षाची धुणी धुण्यासाठी त्यांना पाठिंबा दिलेला नाही. यांना खाखा सुचली आहे. पालिकेच्या 50 हजार कोटींवर यांचा डोळा आहे. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोकही वैतागले आहेत. पुण्याची सभाही पारदर्शक झाली. तिथे रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या, असा हल्ला चढवत मुळा- मुठाचे नाव बदलून काय गाजर ठेवायचे का, अशी खिल्लीही उद्धव यांनी उडवली. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुमचे मंत्रिमंडळ किती बरबटले आहे ते पाहा. कल्याण- डोंबिवलीच्या 27 गावांतील नागरिकांनी यांना काळे झेंडे दाखवले. तुमच्या शिक्षणमंत्र्यांच्या डिग्रीचा पत्ता नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पंतप्रधान मोदींवरही उद्धव यांनी जोरदार हल्ला चढवला. यांना नालेसफाईतील घोटाळा दिसतो, मग नमामी गंगा प्रकल्पात घोटाळा झाला तो पैसा मोदींच्या खिशात गेला का, असा परखड सवाल विचारत स्वतः 10 लाखांचा सूट घालतात आणि यांना मनमोहन सिंह यांचा रेनकोट दिसतो, असा टोलाही लगावला. चरख्यावरून गांधींना उठवले, आता अशोकस्तंभावरून सिंह बाजूला करून मोदींचे चेहरे लावतील. शिवसेनेला संपवण्याचे आदेश दिल्लीवरून सुटतात. यांच्या 700 पिढ्या आल्या, तरी शिवसेना संपणारी नाही, असे आव्हानही उद्धव यांनी दिले. 

राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही, असा टिळकांचा अग्रलेख पुन्हा लिहिण्याची वेळ आली आहे. "सामना'वर बंदी घालणे म्हणजे ही आणीबाणीच आहे. शिवसेनेला औकात दाखवणाऱ्यांना मतदार 23 तारखेला त्यांची जागा दाखवतील. महाराष्ट्र मोदींची गुलामगिरी स्वीकारणार नाही, अशा परखड शब्दांत उद्धव यांनी भाजपवर हल्ला चढवला. 

राज ठाकरे यांनाही चिमटा 
बाळासाहेबांच्या नावावर महापौर बंगल्याची जागा हडपायची आहे, बाळासाहेबांच्या नावावर भ्रष्टाचार चाललाय असे "दुसरे' म्हणत आहेत. मग, युती करायला कशाला आला होता, असा टोलाही उद्धव यांनी राज ठाकरे यांना लगावला. 

Web Title: not accepted Narendra Modi leadership, says Uddhav Thackeray