आता ठाणेकर मोजणार चिमण्या 

श्रीकांत सावंत
सोमवार, 20 मार्च 2017

ठाणे - शहरामध्ये किती चिमण्या आहेत, असा प्रश्‍न कोणी विचारला, तर त्याचे योग्य उत्तर देणे शक्‍य होणार नाही. ही संख्या मोजण्याचा शास्त्रोक्त पर्याय अद्याप कोणीच निवडलेला नाही. शहरातील पक्ष्यांची मोजणी करताना चिमण्यांकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते; मात्र त्यांची संख्याही महत्त्वाची असून शहराच्या कोणत्या भागात किती चिमण्या आहेत, हे तपासण्यासाठी ठाण्यातील "होप' या पर्यावरणस्नेही संस्थेने अन्य सहयोगी संस्थांच्या मदतीने त्या मोजण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलमध्ये ही मोहीम शहरभर राबवली जाणार आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

ठाणे - शहरामध्ये किती चिमण्या आहेत, असा प्रश्‍न कोणी विचारला, तर त्याचे योग्य उत्तर देणे शक्‍य होणार नाही. ही संख्या मोजण्याचा शास्त्रोक्त पर्याय अद्याप कोणीच निवडलेला नाही. शहरातील पक्ष्यांची मोजणी करताना चिमण्यांकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते; मात्र त्यांची संख्याही महत्त्वाची असून शहराच्या कोणत्या भागात किती चिमण्या आहेत, हे तपासण्यासाठी ठाण्यातील "होप' या पर्यावरणस्नेही संस्थेने अन्य सहयोगी संस्थांच्या मदतीने त्या मोजण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलमध्ये ही मोहीम शहरभर राबवली जाणार आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. "जागतिक चिमणी दिना'च्या निमित्ताने "होप' या संस्थेने या विशेष चळवळीची घोषणा केली आहे. 

शहरात ऋतुमानानुसार येणारे स्थलांतरित पक्षी असोत किंवा इथे आढळणारे विविध पक्षी; ठाण्यातील होप संस्थेतर्फे त्यांची गणना प्रत्येक सहा महिन्यांतून केली जाते. यात सगळ्याच प्रजातीमधील पक्ष्यांची नोंद होत असली, तरी पक्षिगणनेत चिमण्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नव्हते. ही गोष्ट लक्षात आल्याने होप संस्थेने चिमण्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात सलग 10 दिवस ठाणे महापालिका क्षेत्रात शहरातील पक्षिप्रेमी, नागरिक शहरातील वेगवेगळ्या 20 रस्त्यांवर फिरून शहरातील चिमण्या मोजणार आहेत. याच्या माध्यमातून शहरातील चिमण्यांची जास्तीत जास्त नोंद होणार असून त्यांची एकूण अधिकृत संख्या मिळण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः शाम घाटे - 9820712222. 

कशी होणार चिमणी गणना... 
ठाणे शहरात एकाच प्रजातीच्या चिमण्या आढळत असून त्यात केवळ नर आणि मादी असा फरक आहे. नर काळपट रंगाचा; तर मादी फिकट रंगाची असते. ठाणे महापालिका परिसरात 16 ते 25 एप्रिलदरम्यान ही गणना सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळात होणार आहे. 14 वर्षांवरील मुलांपासून सगळ्यांना या चिमणी गणनेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी संस्थेकडे नोंद करणे आवश्‍यक आहे. या उपक्रमाची महिती संस्थेच्या www.hopethane.org या संकेतस्थळावरून मिळू शकेल. नागरिकांना त्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे शाम घाटे यांनी दिली.