10 कोटींच्या पार्टी ड्रग्ससह एकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने (एनसीबी) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 10 किलो "पार्टी ड्रग्स'सह एका 25 वर्षीय तरुणाला नुकतीच अटक केली. आरोपी मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी असून, त्याच्याकडून एम्फेटामाईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 10 कोटी रुपये असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

व्यंकटेश पेरियासम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो तमिळनाडू येथील सिंगलादांपुरम येथील रहिवासी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक संशयित तरुण महागडी ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती "एनसीबी'च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याच्याकडील ट्रॉलीमध्ये सुमारे 70 पाकिटे सापडली. त्यात खडीसाखरेसारखा पदार्थ असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आढळले. सर्व पाकिटांमध्ये मिळून एकूण नऊ किलो 900 ग्रॅम अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी त्याला अटक करण्यात आली. व्यंकटेश या आरोपीकडे सापडलेल्या पदार्थाच्या चाचणीत तो एम्फेटामाईन असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये मोठ्या रॅकेटचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी काही संशयित आमच्या रडावर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

एम्फेटामाईन काय आहे? 
एम्फेटामाईन हे पार्टी ड्रग म्हणून प्रसिद्ध आहे. मोठ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये याचा वापर होतो. या ड्रगला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, फिलिपिन्स व थायलंड या देशांत मोठी मागणी आहे. या देशांत या ड्रगची किंमत 10 पटींनी जास्त आहे.