पिस्तुलांची तस्करी  करणारा अटकेत

पिस्तुलांची तस्करी  करणारा अटकेत

उल्हासनगर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सात गावठी पिस्तुलांची तस्करी करण्यासाठी आलेल्या तरुणाला गुरुवारी (ता.१२) रात्री अटक केली आहे. अनुजकुमार जैस्वाल (वय २३, रा. कळवा झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तुलांसोबत सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

कॉलेज तरुणांप्रमाणे बॅग पाठीवर घेऊन तरुण संशयास्पदरित्या शहाड पूलाच्या खाली फेऱ्या मारत असल्याची माहिती मिळताच, गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशरुद्दीन शेख, युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, संजय माळी, भरत नवले, राम मिसाळ, विश्‍वास माने, संजय पाटील, विजय पाटील, विठ्ठल पदमेरे, नवनाथ वाघमारे यांनी शहाड गाठून सापळा लावला. तरुणाच्या हालचालीवर नजर ठेवत कुणाच्या तरी प्रतिक्षेत असलेल्या तरुणावर अखेर पोलिसांनी झडप घातली. त्याच्या बॅगमधून सात गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे सापडली.

तुरुंगातील गुडांसह पिस्तुलांची खरेदी 
अनुजकुमार रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मार्चमध्ये ऑर्थर तुरुंगातून सुटला आहे. जेलमध्येच त्याची आणखीन एका रेकॉर्डवरच्या राजू नावाच्या गुंडासोबत ओळख झाल्यावर जैस्वाल आणि राजू हे उत्तरप्रदेशातील जौनपूरमध्ये गेले. त्यांनी गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे विकत घेतली. गोदान एक्‍स्प्रेसने कल्याणला उतरून शहाड स्थानक गाठले. राजू कामानिमित्त बाहेर गेला. जैस्वालकडे मोबाईल नसल्यामुळे बॅगेतील गावठी पिस्तुलांसह तो राजूची वाट पहात होता. फरार झालेला राजू कोण आहे, त्यांनी जौनपूरमधून कुणाकडून किती रुपयांना पिस्तुल विकत घेतल्या, या पिस्तुलांची तस्करी ते कुणाला करणार होते, याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त मुकुंद हातोटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com